बाळाच्या कुटुंबियांचा संताप; अदलाबदलीबाबत संशयकल्लोळ
। नाशिक । वृत्तसंस्था ।
नाशिक जिल्हा रुग्णालयात रविवारी (दि.13) रात्री जन्मलेले अर्भक मुलगा असल्याचे मातेसह कुटुंबीयांना सांगून सर्वत्र मुलगा अशीच नोंददेखील केली होती. मात्र, काचेच्या पेटीत उपचारासाठी ठेवलेल्या बाळाला खासगी रुग्णालयात नेण्यासाठी बुधवारी (दि.16) रितसर बाळाचा ताबा देताना सिव्हिलमधील स्टाफने मुलगी हातात दिल्याने बाळाच्या आईसह कुटुंबीय आणि नातेवाइकांनी संताप व्यक्त करीत जिल्हा रुग्णालयात आक्रोश केला. त्यामुळे गदारोळ होऊन पालकांनी बाळ स्वीकारण्यास नकार दिला. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी याबाबत चौकशी समिती नेमून सीसीटीव्हीसह अन्य बाबींची तपासणी केली असता बाळाला लावण्यात येणार्या टॅगसह रजिस्टरमध्ये एफऐवजी एम लिहिले गेल्याने घोळ झाला होता. याबाबत 5 डॉक्टर, 3 प्रशिक्षणार्थी डॉक्टर, 4 नर्स आणि 1 मावशीवर कारवाई करण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे यांनी सांगितले.
नांदूर नाका परिसरातील रहिवासी असलेल्या प्रिया ऋषीकेश पवार या महिलेला प्रसूतीसाठी रविवारी (दि.13) जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री 11:30 च्या सुमारास या महिलेला प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर डॉक्टर आणि नर्स यांनी नैसर्गिक प्रसूती केली. त्यावेळी मातेला तसेच कुटुंबीयांना मुलगा झाल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी मातेने बाळाला स्वतःजवळ देण्याची विनंती केली असता बाळाला साफ करायचे असून, त्याला काचेच्या पेटीत ठेवावे लागणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार बाळाला तातडीने नवजात अर्भक दक्षता विभागामध्ये काचेच्या पेटीत ठेवून उपचार सुरू करण्यात आले. मात्र, बाळाची तब्येत बिघडत असल्याचे सांगितल्यावर कुटुंबियांनी जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यास सांगितले. सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नर्सनी बाळ कुटुंबियांच्या हाती दिले. त्यावेळी बाळाचे डायपर बदलत असताना बाळ मुलगा नव्हे तर मुलगी असल्याची बाब कुटुंबियांच्या लक्षात आल्यावर त्यांनी याबाबत विचारणा केली. त्यावर प्रारंभी सिव्हीलमधील संबंधित कर्मचार्यांनी मुलगीच झाली होती, असे सांगत असता कुटुंबियांच्या संतापाचा उद्रेक झाला.
सिव्हीलच्या रजिस्टरवर सर्वत्र मुलगा झाल्याची नोंददेखील निदर्शनास आणून देत तातडीने मुलगा परत देण्याची मागणी केली. दरम्यान ही बाब जिल्हा शल्यचिकित्सकांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी टॅगस कागदोपत्री मुलगा अशीच नोंद असल्याचे सांगितले. तसेच चौकशी समितीदेखील गठित करण्यात आली होती. या प्रकरणाबाबत तात्काळ चौकशी समिती नेमण्यात आली असून समितीने सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. त्याबाबत चौकशी समितीकडून तपासणी करून काय तथ्य आहे, त्याबाबतचा अहवाल लवकरात लवकर देण्याचे निर्देश दिले होते. तसेच सीसीटीव्ह फुटेज आणि अन्य बाबींची सखोल चौकशी, शहानिशा करण्यात आली.