। खांब । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील खांब येथे शेतीसाठी उपयुक्त ठरत असलेल्या शेणखत निर्मितीचे प्रात्यक्षिक कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्यात आला. कृषी विज्ञान केंद्र रोहामार्फत आणि कृषी महाविद्यालय, दापोलीच्या ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रम (रावे) अंतर्गत कार्यरत असलेल्या “कृषी संजीवनी“ गटातील कृषी दूतांनी शेणखत निर्मितीचे प्रात्यक्षिक शेतकर्यांना करून दाखविण्यात आले.
या प्रात्यक्षिक कार्यक्रम प्रसंगी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. तर याबाबत माहिती सांगताना फार्मर यार्ड मॅन्युअर म्हणजेच शेतकर्यांच्या आवारातील खत उत्पादन प्रक्रियेत, जैविक पदार्थांचा वापर करून पोषक तत्वांची साठवण केली जाते. फार्मर यार्ड मॅन्युअर मातीमध्ये घालणे फायद्याचे असते, कारण यामुळे मातीची गुणवत्ता, जलधारण क्षमता आणि पोषणमूल्य वाढते. हे मातीतील सूक्ष्मजीवांची वाढ उत्तेजित करते, ज्यामुळे मातीचा उपजाऊपणा वाढतो. अशाप्रकारची माहिती कृषीदूतांनी यावेळी दिली. या प्रत्याक्षिकासाठी डॉ.अहिरे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कृषी विज्ञान केंद्राचे डॉ.मनोज तलाठी, डॉ.जीवन आरेकर यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.