। रायगड । प्रतिनिधी ।
जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील प्रथमस्तरीय तपासणी झालेल्या 3 हजार 681 मतदान यंत्रांची पहिली जिल्हास्तरीय सरमिसळ (रँडमायझेशन) प्रक्रिया करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या सरमिसळ प्रक्रियेच्यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे, आचारसंहिता पथक प्रमुख उपजिल्हाधिकारी संदीपान सानप, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी निलेश लांडगे आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघाच्या आवश्यकतेनुसार 6 हजार 200 बॅलेट युनिट, 3 हजार 405 कंट्रोल युनिट आणि 3 हजार 681 व्हीव्हीपॅट यंत्रांची पहिली सरमिसळ (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली. तत्पूर्वी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी जावळे यांनी सरमिसळ प्रक्रियेची माहिती दिली. राजकीय पक्षांच्या उपस्थितीत तपासणी पूर्ण करण्यात आली असून ते सुस्थितीत आहेत.