। धुळे । प्रतिनिधी ।
धुळ्यातील जनतेने माझ्यावर फुलांचा वर्षाव बुलडोझरने करीत माणसे जोडण्याचे काम केले आहे, तर उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार बुलडोझरच्या साहाय्याने माणसे तोडण्याचे काम करीत आहे. हाच फरक जातीयवादी व समाजवादी विचारसरणीत आहे. समाजवादी पक्ष माणसे जोडण्याचे काम करतो, तर भाजप माणसे तोडण्याचे काम करतो, अशी टीका समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अखिलेश यादव यांनी येथे केली.
शहरातील जेल रोडवर समाजवादी पक्षाचे उमेदवार इर्शाद जहागीरदार यांच्या प्रचारार्थ शनिवारी (ता.19) सभा झाली. खासदार यादव, खासदार इकरा हसन, प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी, आमदार रईस शेख, युपीचे आमदार नाहीद हसन, इर्शाद जहागीरदार, अमीन पटेल, आकील अन्सारी, आकील मन्सूरी, काँग्रेसचे साबीर शेठ, कैलास चौधरी, गुड्डू काकर, नरेंद्र चौधरी, महेंद्र शिरसाट आदी उपस्थित होते. खासदार यादव म्हणाले की, भाजप देशात धार्मिक तेढ निर्माण करीत आहे. भाईचारा तोडत आहे. स्वामी विवेकानंद अमेरिकेत गेले तेव्हा त्यांनी देशाची एकता व अखंडतेचे गुण गायिले, हे भाजप विसरत आहे. इकरा हसन यांनी समाजवादी विचारांचे सरकार सत्तेवर आले तर सर्वांना सोबत घेऊन विकास केला जाईल, असा विश्वास दिला.
महाराष्ट्राची निवडणूक ऐतिहासिक व मार्गदर्शकराज्यात लोकनियुक्त सरकार सत्तेवर असताना त्यांना गद्दारी करीत सत्तेवरून बाहेर करण्याचे पाप भाजपने केले आहे. महायुतीच्या महादुःखी सरकारला जनतेने सत्तेवरून बाहेर करण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राची निवडणूक ही देशासाठी ऐतिहासिक व मार्गदर्शक आहे. देशात बेरोजगारी, भूकमारी, शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत.उद्योगधंदे गुजरातला नेले जात आहेत. बँक लुटल्या जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात त्यांच्या पुतळ्याच्या कामात घोटाळा होत आहे. लाडकी बहीण योजना आणून महागाई वाढविली जात आहे. महाराष्ट्र ही आंबेडकरांची कर्मभूमी आहे, याठिकाणी संविधान बदलाची भाषा कोणी करत असेल तर जनता त्यांना सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असे खासदार यादव म्हणाले. प्रदेशाध्यक्ष आझमी यांनी भाजप लव्ह जिहाद, वोट जिहाद, लँड जिहाद सांगून मुस्लिम धर्मियांना बदनाम करण्याचे काम करीत आहे. हिंदू-मुस्लिम भाईचारा नष्ट करण्याचे काम करीत आहे. धुळ्यात समाजवादी पक्षाचे हात बळकट करावे, असे आवाहन केले. इर्शाद जहागीरदार यांनी समाजवादी पक्षातर्फे रोजगार, शिक्षण, आरोग्याचे व्हीजन अमलात आणताना विकासाचा प्रश्न, भ्रष्टाचार मुक्त शहराचे स्वप्न साकारले जाईल, असे सांगितले.