दिशादर्शक फलकाजवळच खड्ड्यांचे साम्राज्य
। कोलाड । वार्ताहर ।
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर, रातवड, विठ्ठलवाडी, तळवली, कोलाड, पुई, पुगांव, खांब, सुकेळी, वाकण अशा विविध ठिकाणी दिशादर्शक फलकाजवळच मोठंमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्डयांमुळे वाहनचालकांसह प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. यामुळे संबंधित ठेकेदारांनी दिशादर्शक फलकाजवळील खड्डे भरावेत, अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गांवरील एका बाजुकडून दुसर्या बाजूकडे जाण्यासाठी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. परंतु, ज्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत त्या ठिकाणच्या रस्त्याची परिस्थिती अतिशय बिकट बनली असून या रस्त्यावर मोठंमोठे खड्डे पडलेले आहेत. यामुळे वाहने पलटी होऊन अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी पुगांव येथील दिशादर्शक फलकाजवळून एक इको गाडी जात असतांना येथील खड्ड्यांमध्ये वाहन चालकाने ब्रेक लावला असता गाडी पलटी झाली. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. परंतु, ज्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत त्याच ठिकाणच्या रस्त्याची बिकट परिस्थिती आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली 17 वर्षांपासून सुरु असून हा मार्ग पूर्ण होण्यासाठी लोकनेत्यांकडून फक्त तारीख पे तारीख देण्यात आल्या आहेत. परंतु, या महामार्गाचे काम पूर्ण झाले नाही. आता या महामार्गाची डिसेंबरची डेडलाईन देण्यात आली असून गणपतीनंतर ठिकठिकाणी या मार्गाचे काम वेगाने सुरु आहे. परंतु, असे असले तरी संबंधित ठेकेदारदारांनी एका बाजुकडून दुसर्या बाजूकडे जाणार्या रस्त्याचे काम चांगल्या प्रकारे केले पाहिजे होते. परंतु, कोणत्याही दिशादर्शक फलकाजवळून जाणार्या रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे आहे. यामुळे कोणाचा नाहक बळी गेला तर याला जबाबदार संबंधित ठेकेदार कारणीभूत असेल, असे प्रवासी वर्गातून बोलले जात आहे.
पाच ते सहा दिवसांवर दिवाळी आली असून शाळेतील विद्यार्थ्यांना सुट्ट्या पडत असल्यामुळे लाखो चाकरमानी गावाला येत आहेत. तसेच, पर्यटकदेखील सुट्टयांचा आनंद लुटण्यासाठी कोकणात येत असतात. यातच या मार्गावर मोठ्या वाहनांची वर्दळदेखील सुरु असते. यामुळे दिवाळीपूर्वी सर्व दिशादर्शक फलकांजवळून जाणार्या रस्त्याचे खड्डे भरून रस्ता चांगल्या प्रकारे बनविण्यात यावा.
– अलंकार खांडेकर, सामाजिक कार्यकर्ते