बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे यांना तगडे आव्हान
। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांचे सुपुत्र संदीप नाईक यांनी मंगळवारी शरद पवार गटात प्रवेश केला. संदीप नाईक हे बेलापूर मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छूक होते. मात्र, भाजप नेतृत्त्वाने मंदा म्हात्रे यांना संधी दिल्याने संदीप नाईक यांनी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत वाशी येथील निर्धार मेळाव्यात तुतारी हाती घेतली. यावेळी संदीप नाईक यांच्यासोबत बेलापूर विधानसभा क्षेत्रातील 25 माजी नगरसेवक, माजी महापौर, माजी उपमहापौर आणि अनेक पदाधिकार्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. संदीप नाईक यांनी अख्खी भाजपा खाली केल्यानेे बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे यांच्यासमोर तगडे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.
निर्धार मेळाव्यात शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर संदीप नाईक यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा सोबत काम करण्याची संधी दिली. याबाबत मी आभार व्यक्त करतो. 2019 मध्ये काही कारणास्तव आम्हाला निर्णय घ्यावा लागला. नवी मुंबईच्या हितासाठी आम्हाला निर्णय घ्यावा लागला. काही प्रश्न सत्तेशिवाय मार्गी लागत नाहीत. आम्ही लढलो आणि जिंकून आलो, पण नंतर जे यश आमचे नसून पक्षाचे नसून एकट्या माझे आहे, असे सांगितले गेले. त्यावेळी कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. त्यावेळी आम्हाला दिलेला शब्द, नंतर फिरवला गेला, माझी कोंडी झाली. पण माझ्या शहराची कोंडी झाली नाही पाहिजे. त्यावेळी मी थांबलो, माझ्यासमवेत जे आले त्यांची कामे होतील, यासाठी आम्ही येथे आलो आहोत, असे संदीप नाईक यांनी सांगितले.
भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
संदीप नाईक यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्यापूर्वी भाजपला सोडचिठ्ठी दिली. संदीप नाईक यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा बावनकुळे यांच्याकडे पाठवला होता. संदीप नाईक नवी मुंबई भाजपाचे जिल्हाध्यक्ष होते. त्यांनी जिल्हाध्यक्ष आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. संदीप नाईक यांच्या शरद पवार गटात जाण्याने नवी मुंबईत भाजपला मोठे खिंडार पडल्याची चर्चा आहे. संदीप नाईक यांचे वडील गणेश नाईक यांना भाजपने ऐरोली विधानसभेची उमेदवारी दिली आहे. त्यांनी यापूर्वी आपण मुलगा संदीपचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.