भारतानंतर श्रीलंकेलाही चारली धूळ
। ओमान । वृत्तसंस्था ।
ओमानमध्ये झालेला एमर्जिंग टी-20 आशिया चषक अफगाणिस्तान ‘अ’ संघाने जिंकत इतिहास रचला आहे. अफगाणिस्तानने स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच चषक जिंकण्यात यश मिळवले आहे. अफगाणिस्तानने रविवारी (दि.27) अंतिम सामन्यात श्रीलंका ‘अ’ संघाला 7 गडी राखत पराभूत केले आहे. अफगाणिस्तानने याआधी उपांत्य फेरीत भारताला पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. आता त्यांनी अंतिम सामन्यात श्रीलंकेला पराभूत करत आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे.
श्रीलंकेच्या 133 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या अफगाणिस्तान संघाला पहिला धक्का पहिल्याच चेंडूवर बसला होता. झुबेद अकबरीला सहन अर्रचिगेने पहिल्याच चेंडूवर बाद केले होते. पण त्यानंतर सदिकल्ला अटल आणि कर्णधार दार्विश रसुली यांनी डाव सावरला. तरी रसुली 20 चेंडूत 24 धावा करून बाद झाला. परंतु, करिम जनतने अटलला तोलामोलाची साथ दिली. यामुळे अफगाणिस्तानसाठी विजयाचा मार्ग सुकर झाला. मात्र, असे असले तरी श्रीलंकेचे गोलंदाज सहजासहजी धावा करून देत नव्हते. यामुळे अखेरीस रोमांचक वळणावर सामना होता. यातच 15 व्या षटकात करिम जनत 27 चेंडूत 33 धावांवर बाद झाला. पण एक बाजू अटलने सांभाळलेली होती. त्याच्याबरोबर फलंदाजीला आलेल्या मोहम्मद इशाकने एक षटकार आणि एक चौकार मारून अफगाणिस्तानचा विजय सोपा केला. अखेर 19 व्या षटकात अफगाणिस्तानने विजय निश्चित केला. इशाक 6 चेंडूत 16 धावांवर नाबाद राहिला, तर अटल 55 चेंडूत 55 धावांवर नाबाद राहिला. श्रीलंकेकडून सहन अर्रचिगे, दुशन हेमंता आणि इशान मलिंगा यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
तत्पुर्वी, अंतिम सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, अफगाणिस्तानच्या बिलाल सामी आणि आल्ला घझनफर यांच्या गोलंदाजीपुढे श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. त्यांनी पहिले 4 बळी अवघ्या 15 धावांवर गमावल्या होत्या. पण यांनंतर पवन रथनायके आणि सहन अर्रचिगे यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी 50 धावांची भागीदारी केली. पण पवन 20 धावांवर धावबाद झाला. त्यानंतरही निमेश विमुक्तीने अर्रचिगेची चांगली साथ दिली. यामुळे श्रीलंकेने 100 धावांचा टप्पा पार केला होता. पण निमेशही 18 व्या षटकात 19 चेंडूत 23 धावांवर धावबाद झाला. याच षटकात आर मेंडिसही शुन्यावर बाद झाला. पण सहन अर्रचिगेने आक्रमक खेळत श्रीलंकेला समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहचवले. श्रीलंकेने 20 षटकात 7 बाद 133 धावा केल्या. सहन अर्रचिगे 47 चेंडूत 64 धावांवर नाबाद राहिला. दुशन हेमंता 6 धावांवर नाबाद राहिला. अफगाणिस्ताकडून बिलाल सामीने 3 बळी, तर आल्ला घझनफरने 2 बळी घेतले.