| विरार | प्रतिनिधी |
नागरिकांना आवश्यक असलेल्या तरण तलावाची मोठी दुरवस्था झाली आहे. यामुळे पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेले तलाव देखभाल दुरुस्तीअभावी दुरुस्तीच्या प्रतीक्षेची वाट पाहात आहे.
वसई-विरार महानगरपालिकेने जलतरणपटू आणि शहरातील नागरिकांसाठी उत्तम सोय म्हणून वसई, नवघर दिवाणमान, तामतलाव तर विरार फुलपाडा येथे तरण तलाव बांधण्यात आले आहेत. कोरोना काळात शासकीय निर्बंध असल्याने हे तलाव मागील दोन वर्षे बंद होते. पण, कोरोना काळ संपल्याने नागरिकांच्या मागणीमुळे पालिकेने दिवाणमान आणि तामतलाव येथील तरण तलाव सुरु केले. पण, हे तलाव सुरु करताना पालिकेने इतर सुविधा मात्र सुरु केल्या नाहीत.
दिवाणमान येथील तरण तलावामधील शौचालय तुटले आहे. येथे असलेल्या बाथरूममध्ये असलेले नळ तुटले आहेत. केवळ एकच नळ सुरु असल्याने लोकांना तरण तलावतून आल्यानंतर आंघोळीसाठी दहा ते पंधरा मिनिटात उभे राहावे लागत आहे. यात लहान मुलांसाठी असलेला तरण तलाव बंद आहे. झाकोझी यंत्रणासुद्धा बंद असल्याने नागरिक अपुर्या सेवेने हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी लाद्या फुटल्या आहेत. या दोन्ही तलावांच्या वेळासुद्धा कमी केल्या आहेत.
अगोदर सकाळी पाच ते संध्याकाळी 7.30 वाजेपर्यंत अशी नियमावली ठेवण्यात आली होती. आता सकाळी सहा वाजल्यापासून सुरू करून दुपारच्यावेळी बंद ठेवले जाते. यामुळे जलतरण तलाव अर्धवेळ असल्याने नागरिकांची पोहण्यासाठी मोठी गर्दी होते. यामुळे पूर्णवेळ तलाव सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या ठिकाणी एकूण 500 सदस्य आहेत. एकावेळी 40 सदस्य पोहण्यासाठी येत आहेत. पण सुविधा नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.