न.प. प्रशासनाकडून पाण्याची फवारणी
| चिपळूण | प्रतिनिधी |
खड्डे पडलेल्या शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी नगर परिषदेने दगड-मातीचा वापर केला. आता पाऊस गेल्याने या खड्ड्यातील मातीचा धुरळा शहरभर पसरला आहे. प्रामुख्याने ही माती वाहने गेल्यानंतर उडाल्याने व्यापारी हैराण झाले आहेत. रस्त्यावरील धूळ व्यापार्यांच्या साहित्यावर बसल्याने धूळ साचलेले साहित्य खराब असेल अशी समजूत होऊन ग्राहक पाठ फिरवू लागल्याच्या तक्रारी अनेक व्यापार्यांनी न.प. प्रशासनाकडे केल्यावर न.प.ने उपाय म्हणून शहरातील मुख्य रस्त्यांवर सकाळ-सायंकाळ पाणी मारण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणचे रस्ते विविध कारणांनी म्हणजेच पाण्याची गळती काढणे, नवीन नळ जोडणी, गॅस पाईपलाईन, केबल आदींसाठी खणले गेल्याने संपूर्ण शहरातील रस्त्यांची खड्यांनी चाळण केली आहे. त्यातच अनेक मुख्य रस्त्यांची अत्यंत निकृष्ट कामे झाल्याने सहा महिन्यातच या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सुमारे दोन वर्षांत शहरातील रस्त्यांची कामे झाली नाहीत.
परिणामी, शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्याकरिता प्रशासनाकडून डांबर, खडीऐवजी नदीतील गाळाची माती आणि दगड गोटे यांचा वापर करण्यात आला आहे.
पावसाळ्यात काही प्रमाणात या दगड-मातीमुळे रस्ते झाकले गेले. मात्र, आता पावसाळा संपल्यानंतर खड्ड्यातील माती उडून दगड-गोटे खड्डे सोडून रस्त्यावर इतस्ततः भरकटू लागले आहेत. त्यातच वाहने गेल्यावर रस्त्यात पसरलेले खड्यातील दगड-गोटे वाहनांच्या चाकाखालून आजूबाजूला फेकले जात आहेत. त्याचबरोबर धुरळाही उडत आहे. एकूणच या प्रकारामुळे रस्त्यानजीकच्या व्यापारी तसेच पादचार्यांना त्रास होऊ लागला आहे.
याबाबत काही व्यापार्यांनी न.प. प्रशासनाकडे तक्रार केल्यावर न.प.ने शहरातील मुख्य रस्त्यावरून सकाळी व सायंकाळी टँकरद्वारे पाणी मारण्याचा उपक्रम सुरू केला आहे.