। मुंबई । प्रतिनिधी ।
रणजी ट्र्रॉफी स्पर्धेतील मुंबईचा त्रिपुराविरूद्धचा तिसरा सामना अनिर्णित राहिला. पण, मुंबईला पहिल्या डावात आघाडी घेतल्यामुळे मुंबईला 3 गुण मिळाले व त्रिपुराला एका गुणावर समाधान मानावे लागले आहे. मुंबई संघ 9 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. तर, त्रिपुरा 9 गुणांसह तिसर्या स्थानी आहे. त्यामुळे मुंबईला बाद फेरीमध्ये पोहचण्यासाठी उर्वरीत 4 सामने जिंकावे लागतील व इतर संघांच्या कामगिरीवर मुंबईचे बाद फेरीचे समीकरण अवलंबून असणार आहे.
मुंबईने पहिल्या डावात 450 धावा केल्या होत्या. तसेच, त्रिपुराने पहिल्या डावात 302 धावा उभारल्या व मुंबईने 148 धावांची आघाडी घेतली. मुंबईने दुसर्या डावाची सुरूवात खराब केली. अवघ्या 44 धावांवर मुंबईचे आघाडीचे 5 फलंदाज माघारी परतले होते. पुढे कर्णधार अजिंक्य रहाणे व सिद्धेश लाडने मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण 108 धावांवर सिद्धेशच्या रुपाने मुंबईला सहावा धक्का मिळाला. चौथ्या दिवशी दुपारच्या सत्रात 6 बाद 123 अशी धावसंख्या असताना व 271 धावांची आघाडी असताना मुंबईने त्रिपुराला फलंदाजीसाठी बोलावले. त्रिपुराने दिवस समाप्तीपर्यंत बिन बाद 48 धावा केल्या व 4 दिवसांचा खेळ संपल्यामुळे सामना अनिर्णित राहीला.






