। कोलाड । वार्ताहर ।
मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड बाजापेठेत बुधवारी (दि.30) रात्री आठ वाजाण्याच्या सुमाराला ऐन दिवाळीच्या दिवशीच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यातून मार्ग काढताना प्रवाशांची तारांबल उडाली असल्याचे चित्र पाहवयला मिळाले.
मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड-आंबेवाडी हे बाजारपेठेचे मध्यस्थी ठिकाण असुन येथे कोलाडसह खांब, सुतारवाडी, रातवड परिसरातील असंख्य नागरिक ये-जा करीत असतात. सध्या दिवाळीची लगबग सुरु असुन दिवसभर काम करुन कंपनीतील कामगार व शेतकरी वर्ग बुधवारी संध्याकाळी कोलाड नाक्यावर किराणा सामान, आकाश कंदील, फटाके, भाजी पाला, फुले व हार खरेदी करण्यासाठी आले होते. यादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊन प्रवाशी वर्ग त्रस्त झाला होता.
तसेच, या महामार्गावरील कोलाड पोलिस ठाण्याच्या समोर रस्त्यातच डोजर बंद पडल्यामुळे पुई महिसदरा नदीच्या पुलापासून कोलाड नाक्यापर्यंत दोन किलोमीटरच्या अंतरावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे नागरिकांची मार्ग काढतांना तारांबल उडाली. पुई महिसदरा नदी पुलापासून कोलाड तसेच तळवली पर्यंत एका बाजूच्या मार्गाचे काम सुरु असुन येणारी-जाणारी वाहतूक दुसर्या बाजूने वळविण्यात आली होती. यादरम्यान जर एखादे वाहन बंद पडले तर वाहतूक कोंडी निर्माण होऊन याचा नाहक त्रास प्रवासी वर्गाला सहन करावा लागत आहे.