। कल्याण । वृत्तसंस्था ।
गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करण्यास प्रतिबंध आहे. अशाही परिस्थितीत येथील महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या गस्तीवरील पोलिसांनी तीन वेगळ्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करणार्या व्यक्तिंना पकडून त्या तीन जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
शहाड जवळील म्हारळ रस्त्यावरील सेंच्युरी रेयॉनच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरील भागात सार्वजनिक रस्त्यावर एका टँकरच्या आडोशाला बसून नेमसिंग राठोड हे गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करताना गस्तीवरील पोलिसांना आढळून आले. ते म्हारळ गाव भागात राहतात. दुसर्या एका प्रकरणात कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील नीलम गेस्ट हाऊस मागील गल्लीत ताहीर सय्यद यांना गांजाचे सेवन करताना पोलिसांनी पकडले आहे. ते रिक्षा चालक आहेत. ते नेवाळी नाका भागात राहतात.
कल्याण रेल्वे स्थानकाजवळ बैजनाथ सिंग हे गांजाचे सेवन करत होते. ते चिंचपाडा भागात राहतात. ते मजूर आहेत. गस्तीवर असताना पोलिसांना ते आढळून आले. महात्मा फुले पोलीस ठाण्यातील हवालदार महेंद्र मंझा, श्रीधर वडगावे यांच्या तक्रारीवरून महात्मा फुले पोलीस ठाण्यात या तिन्ही व्यक्तींविरुध्द अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.