। रेवदंडा । प्रतिनिधी ।
अलिबाग-मुरूड-रोहा विधानसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांनी मुरूड तालुक्यात मंगळवारी (दि.5) झंझावाती प्रचाराचा दौरा केला. या प्रचारात त्यांनी गाव बैठकीवर जोर दिला आहे. यावेळी चित्रलेखा पाटील यांनी आमदार दळवी यांचा खरपूस समाचार घेतला आहे.
अलिबाग-मुरूड-रोहा विधानसभा निवडणुक प्रचाराचा शंखनाथ महाविकास आघाडीने केला असून मुरूड तालुक्यातील चोरढे, तळेखार, वळके, मिठेखार, काशीद, भोईघर, कोर्लाई, बोर्ली, मांडला, काकळघर येथे चित्रलेखा पाटील यांनी गाव बैठकीच्या स्वरूपात सभा घेतल्या. यावेळी चित्रलेखा पाटील यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्यावर टिकास्त्र सोडत विद्यमान आमदार हे निष्क्रिय आमदार म्हणून हेटाळणी केली आहे.
पुढे बोलताना चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, तालुक्यातील महिला या महागाईने तर युवक बेरोजगारीने ग्रासलेला असून ही सध्याची गंभीर परिस्थिती आहे. येथील प्रत्येक कारखाना गुजरातमध्ये जात आहे. असे असतानाही विद्यमान आमदार हे चिखलात लोळत मज्जा घेत आहेत. ही मोठी शोकांतीका आहे. यामुळेच उध्दव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा व महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्याचा मानस आहे. यामुळे गद्दारांना चिखलात लोळविण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मत देणं ही काळाची गरज असल्याचे आवाहन चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी केले आहे. यावेळी उबाठा शिवसेनेचे किशोर काजारे व राजश्री मिसाळ यांनी सुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन केले व चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांना निवडून आणण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी शेकापचे अॅड. गौतम पाटील, माजी जि.प.सदस्य द्वारकानाथ नाईक, वामन चौलकर, विजय गिदी, अल्पसंख्याक पदाधिकारी रिझवान फहीम, माजी सरपंच चेतन जावसेन, उबाठा गटाच्या माजी जि.प. सदस्या राजश्री मिसाळ व युवासेना तालुका अध्यक्ष किशोर काजारे तसेच शेकापसह शिवसेना उबाठोचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थिती होते.