। महाड । प्रतिनिधी ।
महाड विधानसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. यातच आता असंख्य सुशिक्षित बेरोजगार तरूणांसह ज्येष्ठ नागरिकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. या विधानसभा निवडणुकीत मतपरिवर्तन होणार असल्याचे व विकसित महाड विधानसभा होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच, मविआच्या उमेदवार स्नेहल माणिक जगताप यांनी औद्योगिक वसाहतीमध्ये स्थानिक तरुणांना नोकरीसाठी प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
आज अनेक तरुण तरुणी उच्च शिक्षण घेत आहेत. मात्र, स्थानिक तरुणांना औद्योगिक वसाहतीतमधील दादागिरी सहन करावी लागत असल्याने अनेक तरुण बाहेरील शहराची वाट धरत आहेत. यातच काही तरुण नोकरीच्या शोधात भटकत आहेत. त्यांना कायमचा रोजगार मिळावा यासाठी महाड मतदार संघातून सुशिक्षित व सर्व घटकांना सोबत घेत विकास साध्य करणारा लोकप्रतिनिधी म्हणून स्नेहल जगताप यांना वाढता पाठिंबा मिळत आहे. स्नेहल जगताप या रोजगारांसह शिक्षणाचा प्रश्न मार्गी लावू शकतात असा विश्वास पक्षकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी तरुणांच्या हाताला रोजगार प्राप्त होईल असा विश्वास देत महाड औद्योगिक वसाहतीमध्ये चाललेली दादागिरी मोडीत काढत नवनवीन उद्योधंद्यांसह नवीन टेक्नॉलॉजीसाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास स्नेहल जगताप यांनी व्यक्त केला आहे.