| बेंगळुरू | वृत्तसंस्था |
कर्नाटकची राजधानी बेंगळुरूच्या यशवंतपूर भागात बीएमटीसी बस चालवत असताना बस चालकाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. बेंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृत बस चालक किरण कुमार (38) हे हसन जिल्ह्यातील रहिवासी असून ते बीएमटीसी डेपो 40 मध्ये काम करत होते. ही घटना (दि.6) बुधवारी घडली किरण कुमार हे त्यांच्या शेवटच्या ड्युटीवर गेले होते. नेलमंगला येथून दसनपुरा युनिटकडे येत असताना चालक किरणला अचानक छातीत दुखू लागल्याने ते चालकाच्या सीटवरून खाली वाकले. यानंतर चालती बस जवळच उभ्या असलेल्या दुसऱ्या बीएमटीसी बसला धडकली. ड्रायव्हर पडल्याचे पाहून बस कंडक्टर ओबलेश यांनी तात्काळ चालती बस थांबवली आणि चालकाला तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र, तोपर्यंत किरण कुमार यांचा मृत्यू झाला होता. बस रस्त्याच्या एका बाजूला धडकल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कोणताही मोठा अपघात होण्याआधीच ओबलेश यांनी बस थांबवली. बस कंडक्टरच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.