| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबई येथे पामबीचवर एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव थार कारने समोरील कारला धडक दिल्याने पामबीच मार्गावर नेरुळ येथे भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून त्यांची पत्नी आणि लहान मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी नेरुळ पोलिसांनी थार चालकाला अटक केली आहे.
दिवा येथे राहणारे मनीष पेडणेकर हे त्यांच्या कारने पत्नी स्नेहा आणि मुलगी अनन्या (वय ४) यांच्यासह पामबीच मार्गाने बेलापूरकडून वाशीकडे येत होते. त्यांची कार नेरुळ येथील सिग्नललगत आली असता पाठीमागून आलेल्या भरधाव कारने त्यांना धडक दिली. त्यानंतर काही अंतर पुढे जाऊन कारदेखील रस्त्यालगत उलटली. तर, कारच्या धडकेनं मनीष यांची कार पाठीमागून पूर्णपणे चेपली जाऊन कारमधील तिघेही गंभीर जखमी झाले होते. त्यात मनीष यांचा जागीच मृत्यू झाला. ओमकार विजय मोरे (26) हा तरुण दारूच्या नशेत आपली थार चालवत असल्याचे समोर आले असून त्याच्या कारमध्ये मद्य पेयाचा बॉक्स आढळून आला आहे. या प्रकरणी अपघातानंतर पळून गेलेल्या थार चालकाला नेरुळ पोलिसांनी अटक केली आहे.