| हमरापूर | वार्ताहर |
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर पेण तालुक्यातील कोलेटीवाडी व आमटेम येथून मुंबईकडे जाणाऱ्या बसवरील चालकास झोपेची डुलकी लागल्याने बस पलटी होऊन अपघात झाल्याने चालकासह सव्वीस जण जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तारळ धुमाळवाडी राजापूर येथून मुंबईकडे जाणाऱ्या बसवरील चालक विनोद हळदणकर हा त्याच्या ताब्यात असणारी बस (क्र. एमएच-47 बीएल- 6299) ही घेऊन मुंबईकडे जात असताना सदर बस मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पेण तालुक्यातील आमटेम नजीक आली असता चालक विनोद हळदणकर यास झोपेची डुलकी लागल्यामुळे बस ही रस्त्याच्या खाली जावून पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात बसमधील रुपाली धुमाल, सखाराम धुमाल, अनिकेत धुमाल, वंदना खोचाडे, सुमित बाणे, समर्थक जाधव, वसंत खोचोडे, रिहान पटणी, अनिल गावकर, सत्यवान पगारे, प्रमोद कांबळे , प्राजक्ता कांबळे, मयुरेश कांबळे, विनायक घडशी, मंगेश नाकटे, पुरुषोत्तम कदम, संकेत तारी, मनोहर आंबेरकर, प्रतिभा यादव, अमिता बाणे, प्रसाद हांडे, जयश्री आंबेरकर, स्वप्नील यादव, नकुल सागवेकर, सुनिता कोंडक, मुंबई हे प्रवाशी जखमी झाले आहेत.
अपघाताचे वृत्त समजताच वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे हे आपल्या सहकाऱ्यासह तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी किरकोळ जखमीना इतर वाहनाने दवाखान्यात दाखल केले. उपचारानंतर बाकीच्या प्रवाशांना मुंबई, नालासोपारा व इतर ठिकाणी पाठवण्यात आले आहे. तर तीन प्रवाशानंवर जेएस.डब्लू. कंपनीच्या संजीवनी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाता प्रकरणी अनिकेत धुमाळ मुंबई यांनी विनोद हळदणकर सिंधुदुर्ग यांच्या विरोधात वडखळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सोनावळे हे करीत आहेत.