| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
‘महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या हितासाठी महाविकास आघाडी (मविआ) महत्त्वाचे निर्णय घेत असून, सोयाबीनला प्रतिक्विंटल सात हजार रुपये भाव, तसेच बोनस देऊ,’ अशी घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केली. कांदा व कापूस उत्पादकांनाही मेहनतीचे फळ मिळेल, असे आश्वासन त्यांनी महाराष्ट्रातील शेतकर्यांना दिले आहे. काँग्रेसने यापूर्वी पंचसूत्री जाहीर केली आहे. यात शेतकरी, महिला, कामगार व युवकांना विविध योजनांची घोषणा केली आहे. परंतु, यात सोयाबीनच्या शेतकर्यांना हमी भावाची घोषणा नव्हती. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर पोस्ट करत महाविकास आघाडी महाराष्ट्रातील शेतकर्यांसाठी ऐतिहासिक पाऊल उचलणार असल्याचे म्हटले आहे. सोयाबीनला सात हजार रुपये प्रति क्विंटल हमी भाव तसेच बोनसही देऊ, याशिवाय कांद्याचा भाव ठरविण्यासाठी एक समिती स्थापन करू आणि कापसालासुद्धा किमान हमी भाव (एमएसपी) देण्यात येईल, अशा घोषणा राहुल गांधी यांनी केल्या आहेत.