। पाली । वार्ताहर ।
पालीसह सुधागड तालुक्यामध्ये विधानसभा निवडणूक मतदानाच्या वेळी बुधवारी (दि.20) सकाळपासून मतदार केंद्रांवर मतदानासाठी तुरळक गर्दी होती. दुपारी एक वाजेपर्यंत मतदान 30% पर्यंत पोहोचले होते. आदिवासी वाड्या पाड्यात व गाव खेड्यातील मतदारांनी शिस्तीचे पालन करुन मतदान सुरळीत पार पडले. पालीतील ग. बा. वडेर हायस्कूल व जिल्हा परिषद शाळा या मतदान केंद्रावर ज्येष्ठांनी मतदानाचा हक्क बजावला. काही ज्येष्ठ नागरिक हे चारचाकी वाहनांनी मतदान केंद्रावर पोहोचले व आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
पालीतील ग.बा. वडेर हायस्कूल हे मतदान केंद्र गैरसोयीचे होत होते. कारण येथे पोहोचण्यासाठी मोठी चढण चढून जावे लागत होते. शिवाय मतदान केंद्राच्या बाहेर दगड व खाचखळगे आहेत. त्यामुळे वृद्ध महिलांची गैरसोय होत होती. यावेळी सुधागड तालुक्यातील बाहेरगावी असलेल्या बर्यापैकी मतदारांनी गावी येऊन मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, तालुक्यात मतदानावेळी कुठेही अनुचित प्रकार पहायला मिळाला नाही. सर्वत्र शांतता व सुव्यवस्था होती.
ग्रामस्थांचे शिस्तीत मतदान
आदिवासी वाड्यापाड्यात व गावांत ग्रामस्थांची शिस्त पाहायला मिळाली. छोट्या गावांमध्ये देखील मतदार अतिशय शिस्तीमध्ये येऊन रांगेत उभे राहून मतदान करून गेले. शिवाय मतदान करतेवेळी अतिशय शांतता देखील होती. तालुक्यातील भावशेत गावातील मतदान केंद्रावर गावासह आजूबाजूच्या ठाकुरवाडी व कातकरवाडी येथील मतदार सकाळी येऊन शिस्तीचे पालन करून मतदान करून गेले. अशीच परिस्थिती भेरव, वाघोशी व इतरही गाव खेड्यात व आदिवासी पाड्यांमध्ये पाहायला मिळाली.
सेल्फी पॉइंटवर गर्दी
पालीतील ग.बा. वडेर हायस्कूल मतदान केंद्राच्या खाली सेल्फी पॉईंट लावण्यात आला होता. या ठिकाणी अनेक मतदारांनी मतदान करून आल्यावर शाई लावलेले बोट दाखवत सेल्फी घेतला. अनेकांनी आपल्या कुटुंबासमवेत तसेच आपल्या जोडीदारासमवेत सेल्फी घेतला.