। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारताची पुरुष दुहेरीतील अनुभवी जोडी सात्विक साईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी यांनी पुनरागमनाच्या स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सात्विक-चिराग जोडीने दुसरी मानांकित जोडी किम अॅस्टरुप-अँडर्स रासमुसेन या डेन्मार्कच्या जोडीवर 21-16, 21-19 असा सरळ दोन डावांत विजय मिळवला आणि अंतिम चार फेरीमध्ये प्रवेश केला.
सात्विक-चिराग या जोडीने पॅरिस ऑलिंपिकनंतर एकाही स्पर्धेत सहभाग घेतला नव्हता. भारतीय जोडी थेट चायना मास्टर्स स्पर्धेत सहभागी झाली. किम अॅस्टरुप-अँडर्स रासमुसेन या जोडीविरुद्ध सात्विक-चिराग जोडीने आश्वासक सुरुवात केली. पहिल्या डावातील ब्रेकपर्यंत भारतीय जोडीकडे 11-8 अशी आघाडी होती. त्यानंतर ही आघाडी 16-10 अशी वाढवण्यात त्यांना यश मिळाले. भारतीय खेळाडूंनी रॅलीच्या खेळात उल्लेखनीय कामगिरी बजावताना पहिला डाव 21-16 असा आपल्या नावावर केला.
सात्विक-चिराग या जोडीसमोर दुसर्या डावात कडवे आव्हान उभे ठाकले. डेन्मार्कच्या जोडीने 7-5 अशी आघाडीही मिळवली. त्यानंतर भारतीय जोडीने 8-8 अशी बरोबरी केली, तसेच ब्रेकमध्ये 11-10 अशी छोटी आघाडीही भारतीय जोडीला घेता आली. डेन्मार्कच्या जोडीने आपला खेळ उंचावला आणि बरोबरी करण्याचा प्रयत्न केला. किम अॅस्टरुपच्या चुकीमुळे भारतीय जोडीला 19-18 असे पुढे होता आले. अखेर सात्विक-चिराग जोडीने 21-19 असा हा गेम जिंकत सामन्यातही यश मिळवले.