। रेवदंडा । वार्ताहर ।
नारळ-सुपारीच्या बागांनी रेवदंडा व चौलचे वातावरणात समतोल राहिले असून निसर्गाचे वरदान ठरलेल्या परिसराला लांबलचक दोन किमीचा अंतराचा सुरक्षित समुद्रकिनारा, समुद्रलगत आगरकोट किल्ला व किल्ला भोवतालची तटबंदी पर्यटकांचे खास आकर्षण आहे. या निसर्गरम्य परिसरात प्री-वेडिंग शुटींगसाठी अवघ्या महाराष्ट्रातून फोटोग्राफर्स भेटी देतात. रेवदंड्यातील पर्यटनास प्री-वेडिंग फोटोग्राफी शुटींग पुरक ठरली असून प्री-वेडिंग फोटोग्राफीला सुविधा संबंधितांनी पुरवाव्यात अशी मागणी समस्त ग्रामस्थ करीत आहेत.
प्री-वेडिंगसाठी मुंबई, पुणे, ठाणे आदी शहरासह संपूर्ण महाराष्ट्रातील फोटोग्राफर्स निसर्गरम्य असलेल्या रेवदंडा व चौल परिसरात प्री-वेडिंगसाठी वधु-वर, तसेच सोबतीला मित्रमंडळी, सगेसोयरे फोटोग्राफरसह त्यांचे सहकारी असा लवाजमा असतो. चौलमधील रामेश्वर मंदिर, शितळादेवी मंदिर, चौल भोवाळे पर्वतवासी श्री दत्त मंदिर, भगवती मंदिर, हिंगुळजा देवी मंदिर या निसर्गरम्य परिसरासह विशेषतः रेवदंडा समुद्रकिनारी व समुद्रलगत आगरकोट किल्ला व आगर किल्ला तटबंदी परिसरात शुटींगसाठी पसंती देतात. येथील समुद्रकिनारी अनेक फोटोग्राफर प्री-वेडिंगचे शुटींग करत असलेले चित्र नित्याने दिसते.
निसर्गरम्य रेवदंडा व चौलमध्ये पर्यटन वाढीस प्री-वेडिंग फोटोग्राफी पुरक ठरली आहे. येथे मोठया संख्येने पर्यटक तसेच प्री-वेडिंग फोटोग्राफर्स येत असून परिसर पर्यटन क्षेत्र म्हणून नावारूपाला येत आहे. येथील परिसरात हॉटेल, लॉजिंग तसेच कॅम्पींग व्यवसायात मोठी वाढ होत आहे शिवाय, रिक्षा, सितारे, थंडपेय दुकाने, छोटी मोठी दुकाने यांना व्यवसायास संधी उपलब्ध होत असून अनेकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होत आहे. स्थानिक ग्रामस्थांची आर्थिक रेलचेल वाढीस जात असून येथील आर्थिकता वाढीस जात आहे. रेवदंडा व चौल परिसरातचा कायापालट होत असल्याचे चित्र दिसते.
रेवदंडा पर्यटनास पुरक ठरलेल्या प्री-वेडिंग फोटोग्राफीला संबंधितांनी विविध सुविधा द्याव्यात अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे. रेवदंडा समुद्रकिनारी, आगरकोट किल्ला व आगरकोट किल्ला तटबंदी परिसरात ड्रोन शुटींगसाठी शासकीय नियमात बदल करण्यात यावेत व संबंधितांनी प्री-वेडिंग शुटींगला सुविधा म्हणून ड्रोन शुटींगसाठी परवानगी द्यावी अशी मागणी होत आहे.