रेवदंडा पोलिसात गुन्हा दाखल
| रेवदंडा | वार्ताहर |
रेवदंडा बायपासनजीक कांदळवनाची तोड करून मातीच्या भरावासह बांधकाम केल्याप्रकरणी रेवदंडा येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चौलचे मंडळ अधिकारी विजय मापुस्कर यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत हकीकत अशी की, रेवदंडा येथील स.न. 40/1/2/अ/, क्षेत्र 0-22-3 आकार 5.12 व चौल स.नं.2688 क्षेत्र 0-23-0 आकार 0-43 या मिळकतीमध्ये अनधिकृत मातीचा भराव करून कांदळवनाची तोड केल्याप्रकरणी रेवदंडा येथील जगदीश लांगी यांनी उपविभागीय अधिकारी अलिबाग यांच्याकडे तक्रार नोंदविली होती. याबाबत उपविभागीय अधिकारी यांनी सदर तक्रार अर्जाची तात्कालीन मंडळ अधिकारी चौल पी.आर.म्हात्रे, वनपरीक्षेत्र अधिकारी व कांदळवन कक्ष अलिबाग समीर शिंदे, चौल दक्षिण तलाठी शीतल म्हात्रे यांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार या जमिनीत कोणत्याही प्रकारचा भराव नसल्याचे त्यांनी नमूद केले होते. तसेच सद्यःस्थितीत तेथे नारळ व सुपारीची झाडे लागवड दिसून असून, कोणत्याही प्रकारचे बांधकाम नसल्याचे म्हटले होते. तर मौजे चौल स.न.2688 क्षेत्र 0-23-0 आकार 0-43 या मिळकतीमध्ये 73.00 मीटर, 22.20 मीटर, 0.90 मीटर पक्के डबराचे कंपाऊंड बांधकाम व 10.00 मी.8.20 मी. 1.00 मी. तसेच 6.50 मी,5.25 मी. 1.00 मी. बांधकाम जमीन मालक समाईक खातेदार चौल येथील सैल खलिल मुकादम यांनी केले असल्याचे दिसून आले. या क्षेत्राची जीपीएस पॉलिगॉन घेऊन गुगल इमेज सन 2015 ते 2023 पर्यंत एमआरएसएसी नकाशाद्वारे व अवलोकन केले असता, चौल स.न.2688 क्षेत्र 0-23-0 आकार 0-43 या मिळकतीमध्ये कांदळवन असल्याचे दिसून आले. सद्यःस्थितीत तेथील कांदळवन तोड झाल्याचे एमआरएसएसी नकाशाद्वारे तसेच तत्कालीन मंडळ अधिकारी चौल यांनी गुन्हा केला आहे, असे मंडळ अधिकारी विजय मापुस्कर यांनी रेवदंडा पोलीस ठाणे येथे सरकारतर्फे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार रेवदंडा पोलीस ठाण्यात सैल खलिल मुकादम यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.