नऊ वर्षांत 21 जणांविरोधात कारवाई; अलिबागसह आठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
रायगड जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकल्पांसह अन्य ठिकाणी कामगारांच्या निमित्ताने बांगलादेशी घुसखोर्यांचा वावर वाढत आहे. जिल्ह्यामध्ये घुसखोरी करणार्या 21 बांगलादेशींनी पकडण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे. माथाडी कामगारांसह गवंडी आदी कामगार म्हणून नागोठणे, अलिबाग, मुरूड, नेरळ, पेण, वडखळ, खोपोली, पोयनाड या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही मंडळी राहात असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्यांना अभय देणार्यांवर कारवाई पोलीस करणार का, असा प्रश्न निर्माण होत आहे.
रायगड जिल्ह्यात दोन हजारांहून अधिक औद्योगिक प्रकल्प आहेत. जिल्ह्यात औद्योगिकरण झपाट्याने वाढत आहे. त्यात पर्यटन वाढीलादेखील गती मिळू लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यात येणार्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. काहीजण फिरण्यासाठी येतात, काही जण जिल्ह्यात नोकरी व्यवसायानिमित्त जिल्ह्यामध्ये स्थायिक होतात. त्यामुळे नागरीकरणदेखील वाढत आहे. काही गावे, शहरांमध्ये भाड्याने राहणे, जागा घेऊन घर बांधून राहणे, अशा पद्धतीने बाहेरील मंडळी जिल्ह्यात येऊ लागले आहेत. परंतु, जिल्ह्यात भारताबाहेरील नागरिक येण्याची संख्यादेखील वाढत आहे. जिल्ह्यातील मोठ मोठ्या प्रकल्पांमध्ये बाहेरील कामगारांचा कल वाढला आहे. त्याचाच फायदा घेऊन काही बांगलादेशी अनेक वर्षे जिल्ह्यात राहात असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यामध्ये घुसखोरी करणार्या बांगलादेशींवर लक्ष ठेवण्यासाठी बांगलादेशी विरोधी पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक गेल्या आठ वर्षांपासून कार्यरत आहे. वेगवेगळ्या खबर्यांमार्फत माहिती घेऊन बेकायदेशीररित्या जिल्ह्यात राहणार्या बांगलादेशींना शोधण्याचे काम हे पथक करते. जिल्ह्यामध्ये नऊ वर्षांमध्ये 21 बांगलादेशींना पकडण्यात या पथकाला यश आले आहे. त्यामध्ये तीन महिला, 18 पुरुषांचा समावेश आहे. जिल्ह्यातील नागोठणे, अलिबाग, मुरूड, नेरळ, पेण, वडखळ, खोपोली, पोयनाड या पोलीस ठाण्यात बांगलादेशींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घुसखोरी करणार्या बांगलादेशींविरोधात कारवाई करीत त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांना त्यांच्या देशात पुन्हा पाठविण्यात आले. आतापर्यंत 19 जणांना त्यांच्या देशामध्ये पाठविले आहे. खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडलेला बांगलादेशी आधारवाडी येथील कारागृहात असून, पोयनाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडलेला बांगलादेशी जामिनावर असल्याची माहिती समोर येत आहे.
जिल्ह्यात वेगवेगळ्या कारणांमुळे बेकायदेशीररित्या बांगलादेशींची घुसखोरी होत आहे. विशेष म्हणजे, रायगड जिल्हा मुंबईच्या अगदी जवळ आला आहे. त्यामुळे काही जण सागरी मार्गाने, तर काही रेल्वेने येऊन वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये कामगार म्हणून काम करतात. जिल्ह्यात बांगलादेशींचा वावर वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. पोलिसांच्या आकडेवारीनुसार, 21 बांगलादेशींना पकडण्यात आले असल्याची माहिती असली, तरी प्रत्यक्षात काही भागातही बांगलादेशी असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास फारसे यश येत नसल्याचे दिसून येत आहे. बांगलादेशी घुसखोर्यांना आधार देण्याचे कामही काही स्थानिक करीत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधातही ठोस पावले उचलल्यास जिल्ह्यात बांगलादेशी घुसखोरी रोखण्यात यश येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नोकरीनिमित्ताने आली खोपोलीला
मागील काही वर्षांपूर्वी खोपोली परिसरात एक महिला भाडेकरू म्हणून राहात होती. बांगलादेशी पथकाला तिची माहिती मिळाल्यावर चौकशी केली असता ती बांगलादेशी असल्याचे समजले. त्या महिलेची माहिती घेतली असता, मुंबईतील एका व्यक्तीने नोकरीच्या निमित्ताने तिला आणले. त्यानंतर खोपोली परिसरात तेथील स्थानिकाच्या मदतीने तिला ठेवल्याचे समारे आले.
कामानिमित्त झारखंड, पंजाब व इतर राज्यांतील कामगार येतात. त्यांच्यासोबत बांगलादेशीसुद्धा येतात. जिल्ह्यात बांगलादेशींनी घुसखोरी करू नये, यासाठी बांगलादेशी विरोधी पथकामार्फत गस्त घातली जाते. खबर्यांमार्फत माहिती घेऊन बांगलादेशींचा शोध घेतला जातो. आतापर्यंत 21 जणांना शोधण्यात यश आले असून, 19 जणांना त्यांच्या देशात सोडण्यात आले आहे.
– तानाजी वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक
बांगलादेशी विरोधी पथक, रायगड