। पनवेल । वार्ताहर ।
विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी लावण्यात येणार्या वाहनांना उपप्रादेशिक परिवहन विभागाचा परवाना असणे आवश्यक असते. त्यासाठी वाहनांना जवळपास दोन हजार रुपयांचे शुल्क भरावे लागते. परवानगी न घेता प्रचार करण्यात येत असल्याचे लक्षात येताच आदर्श आचारसंहितेचा भंग केल्यावरून कारवाई होते. यामुळे विधानसभेसाठी पनवेल आरटीओमधून जवळपास दोन लाख 68 हजार महसूल भरून प्रचारासाठी 134 वाहनांची परवानगी घेण्यात आली होती.
पनवेल परिवहन विभागाच्या अखत्यारीत पनवेल, कर्जत, खालापूर व उरण हे चार तालुके येतात. या चार तालुक्यांतून निवडणूक काळामध्ये 134 वाहनांना प्रचारासाठी परवाना घेण्यात आला होता. यामधून दोन लाख 68 हजारांचा महसूल पनवेल आरटीओकडे जमा झाला आहे. आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी आयोगाकडून खबरदारी घेण्यात येते, तशा आवश्यक सूचनाही सर्व संबंधित विभागांना देण्यात येतात. विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर पनवेल आरटीओमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सर्वांत जास्त 108 गाड्यांसाठी पनवेल आरटीओकडून परवाना घेण्यात आला होता. या काळात राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांकडूनही प्रचाराला वेग आला होता.