| पनवेल | वार्ताहर |
पनवेलमधील मार्केट यार्ड व महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत हातगाडी व्यवसायामुळे मोठ्या प्रमाणात रहदारीस अडथळा होत आहे. तरी सदर बेकायदा हातगाड्यांवर कारवाई करण्याची मागणी हिंदवी सेनेने पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पनवेल शहरातील मार्केट यार्ड व अनेक ठिकाणी अनधिकृत हातगाडी व्यवसायावाले रहदारीस अडथळा करून आपल्या हातगाड्या उभ्या करून ठेवतात. तसेच विना परवाना हातगाडीवर फळे व भाजी विक्री करीत आहेत. यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. तसेच अनेक ठिकाणी बांगलादेशी नागरिक हे हा व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.