। खांब । वार्ताहर ।
रा.जि.परिषदेच्या सूचनेनुसार केंद्र, तालुका आणि जिल्हा स्तरावर क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धाचें आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत रोहा तालुका गटशिक्षणाधिकारी मेघना धायगुडे यांच्या मार्गदर्शनाने, पुगांव केंद्रस्तरीय स्पर्धा सोमवारी (दि.2) शाळा चिल्हे येथे अतिशय जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न करण्यात आल्या.
यावेळी केंद्रातील 10 शाळांमधील जवळपास 200 विद्यार्थी, शिक्षक आणि पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे उदघाटन पुगांव केंद्राच्या केंद्रप्रमुख वैशाली सलागरे, सुदर्शन केमिकल कंपनीचे सीएसआर असिस्टंट मॅनेजर महेश डेरिया, एचआर प्रमुख विलास भालेराव, फिल्ड ऑफिसर अमर चांदणे, सरपंच रवींद्र मरवडे, उपसरपंच संदिप महाडीक, शा.व्य.स. चिल्हे अध्यक्षा वृषाली कोंडे, मुख्याध्यापिका सीमा गायकवाड यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमांची सुरुवात पुगांव शाळेने सादर केलेल्या बहारदार समूहनृत्याने झाली त्यानंतर समूहनृत्य, समूहगीत, पथनाट्य आणि मातीचे शिल्प तयार करणे या व्यक्तिमत्व विकास स्पर्धा आणि लंगडी, लगोरी या सांघिक खेळांचे तसेच बेचकी मारणे आणि दोरी उडी या पारंपरिक खेळांच्या स्पर्धा दिवसभर नियोजनबद्ध रीतीने आणि उत्साहात पार पडल्या. सर्व स्पर्धामधील विजेत्यांना मानचिन्हांचे वाटप करण्यात आले.