। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठण्यातील शांतीनगर भागातील रहिवासी, नागोठण्यातली हायवेनाका येथील हॉटेल विशालचे मालक विलास कांबळे यांचे सुपुत्र तसेच माणगाव येथील केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रम शाळेचे कर्मचारी विशाल विलास कांबळे यांनी त्यांना सापडलेला अॅपल कंपनीचा महागडा आयफोन नागोठणे पोलिसांकडे रविवारी (दि.1) सकाळी सुपूर्द केला आहे. त्यानंतर नागोठणे पोलिसांनी या आयफोन मोबाईलचा मालक सागर हिंदुराव कणसे, रा. मोरया होम टाऊन, चिकणी- नागोठणे यांना रविवारी सायंकाळी परत केला आहे. त्यामुळे विशाल कांबळे यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यासंदर्भात उपलब्ध माहितीनुसार शनिवारी (दि.30) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास विशाल कांबळे हे शांतीनगर भागातील त्यांचे शेजारी मिलिंद जांबेकर यांच्या जनरल स्टोअरमध्ये उभे होते. त्याचवेळी नागोठण्यात येण्यासाठी असलेल्या मुख्य रस्त्यावर व जांबेकर यांच्या दुकानासमोर एक मोबाईल फोन पडलेला विशाल कांबळे यांना दिसून आला.
त्यानंतर ते फोन उचलल्यास गेले असता फोनवरून वाहने गेल्याने मोबाईल फोनचे काहीसे नुकसान झाले होते. मात्र हा अॅपल कंपनीचा महागडा आयफोन असल्याने तो चालू स्थितीत होता. विशाल कांबळे यांनी सदर मोबाईलवर कुणाचा फोन येत आहे का याची खूप वेळ वाट पाहिली. मात्र सकाळपर्यंत कोणाचाही फोन या मोबाईलवर आला नाही. त्यानंतर विशाल कांबळे यांनी नागोठण्यातील पत्रकार अॅड. महेश पवार यांना सोबत नेऊन सापडलेला हा मोबाईल त्यांनी नागोठणे पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार पो.हे.कॉ.ब्रिजेश भायदे यांच्याकडे सुपूर्द केला. दरम्यान नागोठणे पोलीस ठाण्यातील हे. कॉ. ब्रिजेश भायदे यांच्याजवळ असलेल्या या मोबाईल फोनवर मूळ मालक सागर कणसे यांचा फोन आल्यानंतर ब्रिजेश भायदे यांनी कणसे यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले व मोबाईल फोनची ओळख पटवून तो फोन कणसे यांच्या ताब्यात दिला.