। अलिबाग । प्रतिनिधी ।
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांच्या नियोजनानुसार जागतिक एड्स नियंत्रण दिन व सप्ताहनिमित्त पीएनपी वेश्वी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून बुधवारी (दि.4) विद्यार्थ्यांना एड्स जनजागृतीवर आधारित मार्गदर्शन आणि व्याख्यान देण्यात आले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. मिलिंद घाडगे यांनी युवकांनी एचआयव्ही/एड्स विषयी संपूर्ण माहिती घेऊन या उक्तीप्रमाणे प्रतिबंधात्मक उपाय अमलात आणावे, असे सांगितले. तसेच, संजय माने यांनी एचआयव्ही/ एड्स होण्याची कारणे सांगून तो होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी, तसेच त्याची लक्षणे, समज, गैरसमज, एचआयव्ही संसर्गित व्यक्तीला दिली जाणारी एआरटी उपचार पद्धती यावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करून शास्त्रीय माहिती दिली. त्याचप्रमाणे मुलांना करिअर विषयीसुद्धा मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ओमकार पोटे यांनी विद्यार्थ्यांनी एड्स संदर्भात सतर्क रहावे आणि आपले आरोग्य निरामय कसे राहील याची काळजी घ्यावी, असे भाष्य केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.