| नागोठणे | महेश पवार |
घरगुती गॅस दुरुस्तीचे काम चालू असताना अचानक गॅस लिकेज होऊन लागलेल्या आगीचा भडका झाल्याने तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. तर घरगुती सामानासह मंडप डेकोरेशनचे साहित्य या आगीत जळल्याने सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना नागोठण्यातील खडकआळी भागातील विलास विठू जोशी यांच्या राहत्या घरी रविवारी(दि.8) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खडकआळी येथील घरमालक विलास विठू जोशी यांच्या घरात गॅस दुरुस्तीचे काम करण्यासाठी योगेश ठमके हे आले होते. गॅस दुरुस्तीचे काम सुरू असतानाच या आगीत घरमालक विलास विठू जोशी (45) यांच्यासह दिनेश म्हाप्रळकर(17) दोघेही राहणार खडकआळी व योगेश गोपाळ ठमके(48) राहणार आंगरआळी हे तिघेजण जखमी झाले आहेत. या तिघांवर नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर विलास व दिनेश यांना पुढील उपचारासाठी डॉक्टर कोकणे यांच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तर गंभीर जखमी झालेला योगेश ठमके याला अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून याप्रकरणी पुढील तपास नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल दया पाटील या करीत आहेत.