। खोपोली । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात होणार्या आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायती व ग्रामपंचायती इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शेतकरी कामगार पक्षाची भूमिका काय असेल, कार्यकर्त्यांनी कोणत्या पद्धतीने तयारीला लागायचे आहे, त्याचप्रमाणे इतर पक्ष पातळीवरच्या धोरणांवर, विचार विनिमय करण्याकरता रविवारी (दि.17) खोपोली शहरातील समर्थ मंगल कार्यालयात शेतकरी कामगार पक्ष कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे.या मेळाव्यात शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, जिल्हा चिटणीस अॅड. आस्वाद पाटिल आणि इतर मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. खालापुर तसेच खोपोलीत शेकापची ताकद आहे. जयंत पाटील यांना मानणारा वर्ग खालापूर तालुक्यात आहे. त्यामुळे आ. जयंत पाटील या मेळाव्यात काय बोलणार, याकडे खोपोली व खालापूरकरांचे लक्ष लागून राहिले आहे.