। ठाणे । प्रतिनिधी ।
मुरबाड पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या नामदेव मुरलीधर चारस्कर (42) या पोलीस हवालदाराने पोलीस स्थानकाच्या मागील निवासी वसाहतीच्या टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. अनेक दिवसांपासून मुरबाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी तसेच इतर गुन्हे घडत आहेत. त्यामुळे पोलिसांवर कामाचा ताण आहे. रविवारी सायंकाळी कर्तव्यावर असलेले नामदेव चारस्कर यांनी सायंकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास निवासी वसाहतीच्या गच्चीवर जाऊन खाली उडी घेतली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह मुरबाड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेला, त्यानंतर मृतदेह रात्रीच त्यांच्या गावी नेण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विशाल पवार हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज कामत यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.