। मुंबई । प्रतिनिधी ।
सय्यद मुश्ताक अली टी-20 करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीतील लढती सोमवारी (दि.9) निश्चित झाल्या आहेत. मुंबई संघासमोर उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत विदर्भ संघाचे आव्हान असणार आहे. या चारही लढती 11 डिसेंबरला पार पडणार आहेत. दरम्यान, बंगाल-चंदीगड आणि आंध्र-उत्तर प्रदेश यांच्यामध्ये सोमवारी उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढती पार पडल्या. यावेळी बंगालने चंदीगड संघावर 3 धावांनी सनसनाटी विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तसेच, उत्तर प्रदेश संघाने आंध्र संघावर 4 गडी राखून विजय मिळवत अंतिम 8 फेरीमध्ये प्रवेश केला आहे.
सय्यद मुश्ताक अली टी-20 करंडकातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढती निश्चित झाल्या असून, मुंबई आणि विदर्भात सामना होणार असून मध्य प्रदेश-सौराष्ट्र, बडोदा-बंगाल, दिल्ली-उत्तर प्रदेश अशा उर्वरित तीन लढती पार पडणार आहेत. दोन लढती अलूर येथे, तर दोन लढती बंगळूरमध्ये खेळवण्यात येणार आहेत.