। पालघर । प्रतिनिधी ।
वसई-विरार शहर पालिकेने शहरात 5 जून रोजी शहराच्या रस्त्याच्या कडेला झाडे लावून जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा केला होता. यंदाच्या पावसाळ्यात महानगरपालिकेने शहरात 1 लाख झाडांचे वृक्षारोपण करण्याचा मानस ठेवला होता. मात्र, पावसाळा संपून काही महिने लोटले तरीदेखील महानगरपालिकेने वृक्षारोपण करण्याच्या कामाला सुरुवात केली नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे पालिकेने वृक्षारोपण करण्याच्या कामाचे दिलेले उद्दिष्टे कुठेतरी फोल ठरताना दिसत आहे.
वसई-विरार शहरात लागवड केल्या जाणार्या झाडांमध्ये बांबू, आंबा, वड, पिंपळ, काजू, खैर, गुलमोहर, कडुलिंब, जांभूळ, बकुल , चिंच, आपटा, ऐन अशा विविध प्रकारच्या वृक्षाच्या प्रजातीचा समावेश असणार होता. शहरात कृत्रिम जंगल उभारण्याचा एक भाग म्हणून वृक्ष लागवडीचा प्रकल्प पालिका हाती घेणार होती. मात्र, पावसाळा संपून गेला तरी देखील पालिकेने झाडे लावण्याच्या मोहिमेला गती दिली नाही. तर, नियोजित केलेला मानस पालिकेच्या कागदावरच धुळखात पडला आहे.