हिरव्यागार दुभाजकांमुळे वातावरण आल्हाददायक
। पनवेल । वार्ताहर ।
निसर्गरम्य शहर म्हणून ओळखल्या जाणार्या खारघर वसाहतीमधील रस्ते दुभाजकांच्या सुशोभीकरणाचे काम पालिकेकडून हाती घेण्यात आले आहे. दुभाजकांत रंगीबेरंगी विदेशी फुलांच्या झाडांची लागवड केल्यामुळे पर्यावरण, तसेच शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. हिरव्यागार दुभाजकांमुळे वाहनचालकांनासुद्धा आल्हाददायक वाटत आहे.
सिडकोने खारघर शहर विकसित करताना रस्त्याच्या दुभाजकात पाम झाडांची लागवड करून रस्ते सुशोभित केले होते; मात्र पनवेल महापालिका अस्तित्वात आल्यानंतर खारघर वसाहत पनवेल पालिकेकडे हस्तांतरित झाली. दरम्यान, पालिकेकडे खारघर वसाहत हस्तांतरित झाल्यावर दुभाजकात, तसेच उत्सव चौक परिसरातील हिरवळकडे दुर्लक्ष झाल्यामुळे उन्हामुळे झाडे सुकून गेली होती. हिरानंदानी पुलाकडून बँक ऑफ इंडिया सर्कल आणि स्टेट बँक ऑफ इंडिया कॉलनीकडून भारती विद्यापीठमार्गे उत्सव चौक, सेंट्रल पार्ककडून तळोजा शीघ्र कृती दल दरम्यानच्या मुख्य रस्ते, तसेच बँक ऑफ इंडियाकडून घरकुल, वास्तुविहार आणि सेक्टर 18कडून उत्सव चौकमार्गे सेक्टर सहा आणि डेली बाजारकडून चेरोबा मंदिर; तर शहीद योगेश पाटील पेट्रोलपंपाकडून रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलकडे जाणारा रस्ता, ग्रामविकासकडून मुर्बी गाव आणि स्पॅगेटीकडून पेठगाव आणि तळोजा गावकडे जाणारा याशिवाय जलवायूकडून ओवेगाव अशा मुख्य रस्त्यांवरील 14 किलोमीटर दुभाजकांचे पालिकेकडून सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
ही विदेशी फुलझाडे लावणार आलमंदा, पेंडूनुस स्टुबेरी, हमेलिया, तगर मिनी, इक्सोरा सिंगापोरेन्सिस, वाडेलिया, ग्राबा पल्पल सिंगल फ्लॉवर, लार्ज फ्लॉवरिंग ट्री, दुरांता गोल्डन, थेवेटिया, पफ प्लांट आदी विदेशी फुलझाडे दुभाजकांमध्ये लावण्यात येत आहेत. देखभाल दुरुस्तीसाठी एक कोटीपालिकेने दुभाजक सुशोभीकरणासाठी एका एजन्सीची तीन वर्षांसाठी नेमणूक केली आहे. दुभाजकात विविध फुलांची झाडे लावून देखभाल दुरुस्तीचे काम देण्यात आले आहे. या कामासाठी पालिका एक कोटी रुपये खर्च करणार असल्याचे समजते. सुशोभीकरणासाठी तीन कोटीपनवेल महापालिकेने खारघर, कामोठे, कळंबोली आणि पनवेल वसाहतीमधील विविध रस्ते दुभाजक सुशोभीकरणाचे काम एका एजन्सीला दिले आहे. या कामासाठी पालिकेकडून तीन कोटी 85 लाख 61 हजार रुपये खर्च केला जाणार आहे.