महिला सक्षमीकरणासाठी प्रतिभा सन्मान पुरस्कार
| अलिबाग | वार्ताहर |
प्रभा गृहद्योगच्या सीईओ आणि जागृती फाऊंडेशनच्या सर्वेसर्वा रत्नप्रभा बेल्हेकर यांना महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल नवी दिल्ली येथे राष्ट्रीय प्रतिभा सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले.
हा कार्यक्रम शनिवारी (दि. 7) लिंगायत लालितादेवी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, नवी दिल्ली येथे गोल्डन स्पारो या संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून टेलिव्हिजनवरील ‘महाभारत’ या सीरियलमध्ये युधिष्ठिरची भूमिका साकारणारे अभिनेते गजेंद्र चौहान, प.पू. साध्वी प्रज्ञा देवी, आयोजक डॉ. तिलक तन्वर, ऑल इंडिया रेडिओचे आर.जे. आरती मल्होत्रा आणि इतर मान्यवरसुद्धा उपस्थित होते.
संपूर्ण भारतातून फक्त 51 पुरस्कार्थी निवडण्यात आले होते. रायगड जिल्ह्यातून रत्नप्रभा बेल्हेकर ह्या एकमेव पुरस्कार प्राप्त होत्या. सौ. बेल्हेकर ह्या गेली 25 वर्षे स्वतःचा फूड आणि टेलरिंग व्यवसाय चालवितात. परंतु, स्वतःच्या प्रगतीबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रात गरीब आणि गरजू महिलांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी मोफत व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचा त्यांचा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. आजपर्यंत त्यांनी जवळजवळ 4500 महिलांना आपला अमूल्य वेळ देऊन व्यावसायिक प्रशिक्षण तर दिलेच; पण त्यांच्या कौटुंबिक समस्या सोवण्यासाठीसुद्धा नेहमी तत्पर असतात. सरकारी स्कीम राबवणे, मुलांना शैक्षिणक साहित्य पुरवणे, फीस भरणे यासारखी कामे त्या आनंदाने करतात. आतापर्यंत त्यांना बरेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्यांच्या आयुष्याचे एकच ध्येय आहे. समाजातील प्रत्येक महिला ही सक्षम झाली पाहिजे. या कार्यासाठी त्यांच्या टीमचे कौतुक करण्यात येत आहे.