। ठाणे । प्रतिनिधी ।
आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना भिवंडी येथील वाशिंद भागात घडलीआहे. घरगुती भांडणातून एका महिलेने तिच्या एक वर्षाच्या मुलाचा पाण्याच्या टाकीत बुडवून जीव घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महिलेविरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.
घटनेतील आरोपी महिला तिच्या पती व सासूसोबत वाशिंद भागात राहत असून वर्षभरापूर्वी तिला मुलगा झाला. परंतु त्याला जन्मतःच आजार असल्याने त्याच्यावर मुंबईतील वाडीया रुग्णालयात उपचार सुरु होते. आजारी मुलगा जन्माला घातला यावरुन आरोपी सून आणि तिची सासू यांच्यात नेहमीच वाद होत होते. बुधवारी पहाटे चिमुकल्याच्या आईने सर्वांची नजर चुकवून घराच्या पहिल्या माळ्यावरील टाकीत बुडवून त्याची हत्या केली. त्यानंतर मुलगा घरामध्ये आढळून आला नाही म्हणून घाबरलेल्या कुटुंबाने मुलाचा सर्वत्र शोध घेतला. तर दुसरीकडे चिमुकला हरवल्याचा कांगावा आरोपी आईनं केला. मात्र पतीला पत्नीवर खोटं बोलत असल्याचा संशय आला. पतीने अधिक चौकशी केली असता, तिनेच मुलाला मारल्याचे कबुल केले.
याबाबत महिलेच्या पतीने पोलिसांना माहिती दिली असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पाण्याच्या टाकीतून मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी महिलेची चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबूली दिली. तिची सासू मुलावर हक्क गाजवित असे. तसेच कौटुंबिक कारणामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती दिली.