डेडलाईन हुकण्याची दाट शक्यता
। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
राज्यातील लोकसभा निवडणुकीपूर्वी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबरपर्यंत 2024 पर्यंत पूर्ण होईल व महामार्गाचे काम हे युद्धपातळीवर सुरू असल्याचे आश्वासने कोकणातील सर्व पक्षाच्या नेत्यांनी दिली होती. मात्र, सध्या सुरू असलेले महामार्गाचे काम संथगतीने सुरू असून या संदर्भ मार्गावरील अनेक पुलांची कामे अद्याप अपूर्णच आहेत. या महामार्गवरील कामे पूर्ण होण्यास आणखी कालावधी लागणार आहे. त्यामुळे डिसेंबर 2024 ही डेडलाईन हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील वडखळपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे; मात्र नागोठणे, कोलाड, माणगाव येथील प्रमुख पुलांचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. पळस्पे ते इंदापूर हा तब्बल 84 किलोमीटरचा रस्ता सर्वात तापदायक होता. याचे दोन टप्प्यात विभाजन केल्यानंतर पळस्पे ते कासूपर्यंत काम होत आले आहे; मात्र त्यानंतर काम पूर्ण ठप्प झाले आहे. माणगाव बायपासचे काम झालेले नाही. त्याच्या पुढच्या रस्त्याचे काम एलएनटीकडे असून बहुतांश काम पूर्ण झाले आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम हे 2010 पासून संथगतीने सुरू आहे. ठेकेदारांच्या निष्काळजीमुळे महामार्गाचे काम रखडले आहे. महामार्गाचे काम होण्यासाठी जनआक्रोश समितीने माणगाव येथे उपोषण केले होते. याची दखल प्रशासनाने घेतली होती. तसेच, माणगाव येथे प्रशासकीय कार्यालयाला पत्र देऊन दिंडीही काढण्यात आली होती. विशेष बाब म्हणजे स्वतः बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी तब्बल 5 वेळा पाहणी दौराही केला होता. त्याचबरोबर निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही माणगावपर्यंत पाहणी केली होती. जनआक्रोश समिती या महामार्गाबाबत सतत पाठपुरावा करत असून शासनाकडून मिळणार्या खोट्या डेडलाईनने त्रस्त कोकणवासीयांना पुन्हा आंदोलनाच्या मार्गावर असून पुढील नियोजनाबाबत सध्या जनआक्रोश समितीची चर्चा सुरू आहे.