। नागपूर । प्रतिनिधी ।
गेल्या काही वर्षांत समुद्रात मासेमारीसाठी येणार्या परराज्यातील ट्रॉलर्सवरील खलाशांकडून कोकणातील मच्छीमारांवरील हल्ल्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. हे हल्ले रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा. रत्नागिरीतील एका बोटीवर काम करणार्या रवींद्र नाटेकर यांची त्याच बोटीवरील नेपाळी कामगारांनी गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करून नाटेकर कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची आग्रही मागणी विधानसभेतील शिवसेनेचे गटनेते भास्कर जाधव यांनी केली आहे.
विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे भास्कर जाधव यांनी कोकणातील मच्छीमार समाजाच्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे. कोकणातील सात सागरी जिल्ह्यांत मत्स्योत्पादन व परकीय चलन प्राप्त करण्यात मच्छीमार बांधवांचे मोलाचे योगदान लाभत आहे, पण तरीही शासनाच्या विविध सोयीसुविधा व योजनांपासून हा मच्छीमार समाज वंचित राहिला आहे.
समुद्रातून मासेमारी करून मच्छीमार हा ससून गोदीत परत येतो तेव्हा तेथे त्याची राहण्याची सोय नाही. मुंबईत असलेल्या कामगार बोर्डाच्या जागांपैकी त्यांच्या निवासासाठी उपलब्ध करून द्यावी, मच्छीमारांना कर्जमाफी देण्यात यावी, एनसीबीसीच्या कर्जासाठी उत्पन्नाची मर्यादा वाढवण्यात यावी, मच्छीमार समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज मिळण्यासाठी बँकांच्या अटी शिथिल करण्यात याव्यात, मच्छीमार तरुणांना नोकर्यांमध्ये प्राधान्य देण्यात यावे, मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्यात यावा, धूप प्रतिबंधक बंधारे बांधण्यात यावेत, याकडे त्यांनी शासनाचे लक्ष वेधले.