सिडकोच्या ठेकेदाराने मारले फाटयावर, महसूल अधिकार्यांची चालढकल
। पेण । प्रतिनिधी ।
सिडकोची पाण्याची पाईपलाईन अनधिकृतरित्या भोगावती नदीचे पात्र खोदून टाकण्याचे काम स्काय व्हे ही कंपनी करत आहे. याबाबत 11 डिसेंबर रोजी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी तहसीलदार तानाजी शेजाल यांच्याकडे फोनवरून रितसर तक्रार केली होती. या तक्रारीनुसार पेण मंडळ अधिकारी सुजाता जाधव, पेण तलाठी अनिकेत पाटील यांनी जागेवर जाऊन रितसर पंचनामे केले होते. त्यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना ठेकेदाराची यंत्रसामग्र्री ताब्यात घेण्याची विनंती केली होती.
मात्र महसुल कर्मचार्यांनी यंत्र सामग्री ताब्यात न घेता दंडात्मक कारवाई करण्याचा कांगावा प्रसार माध्यमांसमोर केला. त्यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. आज या घटनेला आज आठ दिवस उलटून गेले तरीही मंडळ अधिकारी व तलाठी यांचा रिपोर्ट तहसिलदारांना पोहोच झालेला नाही अथवा ठेकेदाराविरोधात दंडात्मक कारवाई झालेली नाही. या विषयी तहसिलदार तानाजी शेजाल यांना विचारणा केली असता मिटींगमध्ये अलिबाग येथे असल्याचे सांगण्यात आले. मग कृषीवलच्या प्रतिनिधीने नायब तहसिलदार नितीन परदेशी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी फोनवरून महसुल कर्मचार्यांना विचारले की नक्की काय झालंय. त्यावेळी समोरून सांगण्यात आले की, ठेकेदार जबाब द्यायला तयार नसून तो फोन उचलत नाही.
महत्त्वाची बाब म्हणजे नदीमध्ये उत्खनन व भराव झालेला आहे. त्याबाबतचा पंचनामा झाला आहे. यासाठी ठेकेदाराच्या जबाबाची गरज काय आहे? आणि जर खरच गरज असेल तर महसुल खात्यापेक्षा ठेकेदार मोठा आहे का? जर महसुल खात्याला ठेकेदार फाट्यावर मारत असेल तर महसूल विभागाचे अधिकारी आर्थिक हितसंबंध जोपासत आहेत का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
सिडकोची लाईन ही अनधिकृत नदीमधून जात आहे. ज्या जागेवरून पाईपलाईन न्यायची आहे, त्या जागेवर अतिक्रमण आहे. ते अतिक्रमण हटविण्यास सिडको प्रशासन चालढकल करत आहे. तसेच ठेकेदार महसुल खात्याच्या कर्मचार्यांना काही अमिष दाखवून गप्प राहण्यास प्रवृत्त करत आहे. त्यामुळे 8 दिवस उलटूनही मंडळ अधिकारी आणि तलाठी दंडात्मक कारवाई करत नाहीत, असा आरोप नागरिकांडून करण्यात येत आहे. ठेकेदाराची यंत्र सामग्री महसुल खात्याने ताब्यात घेतली असती तर ठेकेदार तहसिल कार्यालयात हजर राहिला असता. मात्र असे न झाल्याने संशयाला जागा उरत आहे. एकंदरीत ठेकेदार एकतर महसुल कर्मचार्यांना धनलक्ष्मी लाभ देत आहे अथवा ठेकेदाराला महसुल खात्याचा भय वाटत नाही, असा आरोपही स्थानिकांकडून करण्यात आला आहे.