करोडो रुपयांचे नुकसान
। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।
मुरुड शहरातील मुख्य बाजारपेठमधील एका इमारतीतील कपड्याच्या दुकानाला आग लागली. ही आग एवढी भीषण होती की हि आग वरच्या मजल्यावर आग पसरल्याने पुर्णतः इमारत जमीनदोस्त झाली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र यामध्ये करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मुरुड शहरातील मुख्य बाजारपेठमधील उमेश गोबरे यांच्या मालकीच्या एक मजली इमारतीमधील खालच्या गाळ्यातील विजय जैन यांच्या कपड्यांच्या दुकानाला सुरवातीला आग लागली. त्यानंतर ही आग नाकोडो ज्वेलर्स-अशोक जैन यांचा व वरच्या मजल्यावर वास्तव करणारे मालक-उमेश गोबरे यांच्या वरच्या मजल्यावर पसरली. जैन यांनी स्वतः आग विझविण्याचा प्रयत्न केला परंतु कपड्यांला आग लागल्याने ही आग भडकत गेली. त्यांनी तात्काळ मुरुड जंजिरा नगरपरिषद अग्निशमन दलाला माहिती दिली असता अग्निशमन गाडी घटनास्थळी दाखल झाली. स्थानिकांनी तसेच, अग्निशमन जवानांनी ही आग आटोक्यात आणण्यात प्रयत्न केला. अखेर सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर हि आग आटोक्यात आणण्यात यश आले.
सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, यामध्ये करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग कशी लागली याचा तपास मुरुड पोलीस करित आहेत.