। नागपूर । प्रतिनिधी ।
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद नागपूरमध्ये विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उमटले आहेत. विरोधी पक्षांनी नागपूरमध्ये संविधान चौकात आणि विधानभवन परिसरात अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध केला. शिवसेना (उद्धव ठाकरे) आ. आदित्य ठाकरे, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी आंदोलन केले.
केंद्रीय गृहमंत्री यांनी संसदेत केलेल्या भाषणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याप्रकरणी नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून व अभिवादन करून महाविकास आघाडीच्या आमदारांनी आक्रमकपणे आंदोलन केले. हातात बाबासाहेबांचे फोटो घेऊन आणि घोषणा देत सर्व आमदारांनी संविधान चौकापासून पायी चालत विधानभवनात प्रवेश केला. यावेळी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे आ. आदित्य ठाकरे म्हणाले की, भाजपकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झाला आहे. हा त्यांचाच नव्हे तर संविधान आणि जनतेचादेखील अपमान आहे. बाबासाहेबांनी सर्व समाज घटकातील लोकांना न्याय दिला आहे. जसे आम्हाला वाटते अपमान झालाय तसे नितीश कुमार, रामदास आठवले आणि सत्तेतील मित्र पक्षांना वाटत नाही का? वाटत असेल तर त्यांनी आंदोलन केले पाहिजे, रस्त्यावर उतरले पाहिजे. भाजपच्या मनातले ओठावर आले आहे, अशी टीका आ. आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
दरम्यान, विधान भवन परिसरात महाविकास आघाडीच्या आमदारांनी ‘आंबेडकर, आंबेडकर’ घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.