उच्च न्यायालयाने सुनावले खडेबोल
। मुंबई । प्रतिनिधी ।
मुख्यमंत्री असो वा उपमुख्यमंत्री आम्हाला त्याच्याशी काहीही घेणेदेणे नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने बुधवारी (दि.18) शिंदेंचे चांगलेच वाभाडे काढले आहेत. माझ्या होर्डिंग्स, बॅनरला हात लावू नका, असे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर मुंबई महापालिकेच्या अधिकार्यांना बजावले होते. हे फर्मान एकनाथ शिंदेंच्या अंगलट आले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या फर्मानचे एका इंग्रजी दैनिकाने वृत्त दिले होते. त्याची प्रत प्रतिज्ञापत्रावर सादर करत सामाजिक कार्यकर्ते जोरू बथेना यांनी ही बाब मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणली होती. या प्रतिज्ञापत्राची प्रत राज्य शासन व मुंबई पालिकेला देण्यात आली आहे. त्याचे उत्तर दिले गेले नाही, असे अॅड. मनोज शिरसाट यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केले आहे. तसेच, माझ्या होर्डिंग्स, बॅनरवर कारवाई केली जात आहे. यापुढे माझ्या कोणत्याच होर्डिंग्स, बॅनरवर कारवाई करू नका, असे सर्व अतिरिक्त पालिका आयुक्तांना मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले होते, अशी माहिती अॅड. शिरसाट यांनी न्यायालयाला दिली आहे. तेव्हाचे मुख्यमंत्री आता उपमुख्यमंत्री आहेत, असे अॅड. डॉ. उदय वारुंजीकर यांनी न्यायालयाला सांगितले. आम्हाला त्याच्याशी काहीही घेणेदेणे नाही. असे घडले असेल तर त्याचा खुलासा व्हायला हवा. महाधिवक्त्यांनी यासाठी गुरुवारी हजर रहावे, असे आदेश देत खंडपीठाने ही सुनावणी तहकूब केली होती.