। चिरनेर । प्रतिनिधी ।
उरण समुद्र किनार्यावरील शेतीचे समुद्राच्या भरतीपासून संरक्षण करणारी बांधबंधिस्ती कमजोर झाली आहे. या नादुरुस्त बांधांना समुद्राच्या भरतीच्यावेळी खाडीतील पाणी येथील भात शेतीत शिरू लागले आहे. याकडे शासनाच्या खारबंधिस्तीकडे खैरलांड विभागाच्या दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे जमिनी नापीक होण्याची शक्यता वाढली आहे. खाडी बांधालगतच्या 2 हजार हेक्टर जमिनी धोक्यात आल्या आहेत. या जमिनीचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची मागणी येथील शेतकर्यांनी केली आहे.
एकेकाळी उरण तालुका हा शेतीसाठी प्रसिद्ध होता. हा तालुका भाताचे कोठारच होते. मात्र, गेल्या 50 वर्षात हजारो एकर जमीनी केंद्र व राज्य सरकारच्या औद्योगिक प्रकल्प बंदर आणि खाजगी उद्योगधंद्यांसाठी संपादित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उरणमधील शेतजमिनी कमी झाल्या आहेत. तरी देखील उरणच्या नागाव, केगाव व चाणजे तसेच उरण पूर्व विभागातील खोपटे, कोप्रोली चिरनेर, आवरे, गोवठणे, वशेणी, पुनाडे, बोरकर, धुतुम, मोठीजुई आदी खाडी किनारच्या जमीनी भात पिकाखाली आहेत. मात्र, या जमिनीच्या परिसरात समुद्राच्या भरतीच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आलेल्या नैसर्गिक वाटा बंद किंवा बुजवण्यात येत आहेत. त्यामुळे शेतीच्या सुरक्षेसाठी बांधण्यात आलेले बांध नादुरुस्त होऊन, भात शेतीत पाणी शिरू लागले आहे. यात खोपटे, मोठीजुई, बोरखार, टाकीगाव या परिसरातील शेतीमध्ये पाणी घुसून शेतीचे नुकसान होत असल्याची माहिती येथील शेतकर्यांनी दिली.