‘गुड मॉर्निंग’ ठरला चषकाचा मानकरी
। मुंबई । प्रतिनिधी ।
बळीराम क्रीडा मंडळाच्या 51व्या कबड्डी महोत्सवानिमित्त काळाचौकी येथील आंबेवाडीतील बळीराम मंडळाच्या पटांगणावर कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पुरुष प्रथम श्रेणी गटात गुड मॉर्निंग स्पोर्ट्सने जेतेपद पटकावले आहे. तर, गुड मॉर्निंगचा शार्दुल पाटील स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला आहे.
पुरुषांच्या प्रथम श्रेणी गटातील अंतिम सामन्यात गुड मॉर्निंगने लायन्स स्पोर्ट्सचा प्रतिकार 42-33 असा मोडून काढत बळीराम चषक आपल्या नावे केला आहे. गुड मॉर्निंगने सुरुवात आक्रमक करीत 2 लोण देत पूर्वार्धात 19-14 अशी आश्वासक आधाडी घेतली. उत्तरार्धात आणखी एक लोण देत आपले विजेतेपद निश्चित केले. लायन्सने देखील पूर्वार्धात लोणची परतफेड करीत कडवी लढत दिली. गुड मॉर्निंगने पूर्ण डावात 6 बोनस व एक अव्वल पकड केली, तर लायन्सने पूर्ण डावात 7 बोनस गुण करीत सामन्यातील रंगत कायम ठेवली होती. यावेळी, गुड मॉर्निंग स्पोर्ट्सला रोख रक्कम रु. 10 हजार 1 व चषक देऊन गौरविण्यात आले. तर, उपविजेत्या लायन्स स्पोर्ट्सला रोख रक्कम रु. 8 हजार 1 व चषकावर समाधान मानावे लागले.
गुड मॉर्निंगचा शार्दुल पाटील याच्या दमदार चढाया आणि त्याला साहिल राणे, सर्वेश पांचाळ यांची मिळालेली बचावाची भक्कम साथ यामुळेच गुड मॉर्निंगने आपला विजय साकारला आहे. शार्दुल पाटील सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरला असून त्याला रोख रक्कम रू. 4 हजार 444 व चषक देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच, लायन्सच्या राज आचार्यने उत्तरार्धात एकाच चढाईत 4 गडी टिपत सामन्यातील चुरस वाढविली होती. त्याला शुभम मटकरने उत्तम पकडी करीत छान साथ दिली. परंतु, संघाला विजयी करण्यात ते कमी पडले. गुड मॉर्निंगच्या साहिल राणे आणि लायन्सच्या राज आचार्य यांना स्पर्धेतील अनुक्रमे उत्कृष्ट पकडी आणि चढाईचे खेळाडू म्हणून निवडण्यात आले. त्यांना प्रत्येकी रोख रक्कम रू. 2 हजार 222 व चषक प्रदान करून गौरविण्यात आले.
या अगोदर झालेल्या उपांत्य सामन्यात लायन्स स्पोर्ट्सने अमर क्रीडा मंडळाला 36-26 असे, तर गुड मॉर्निंगने जय भारत संघाला चुरशीच्या लढतीत 30-29 असे पराभूत करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. दोन्ही उपांत्य पराभूत संघाना प्रत्येकी रोख रक्कम रू. 5 हजार 1 व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व रोख रकमेची पारितोषिके लक्ष्मीबाई ठोंबरे यांच्यावतीने प्रदान करण्यात आली. यावेळी, लालबागच्या राजाचे सचिव सुधीर साळवी, नगरसेवक सचिन पडवळ, लक्ष्मीबाई ठोंबरे, जयश्री सुर्वे, स्पर्धा निरीक्षक अनिल केशव, पंच प्रमुख सुनील नवले यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे बक्षीस वितरण पार पडले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बळीराम मंडळाच्या सर्व पदाधिकार्यांनी व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले होते.