। पालघर । प्रतिनिधी ।
मीरा-भाईंदर शहरात भाईंदर पश्चिमेला एकमेव एसटी आगार आहे. या एसटी आगारात प्रवासी व कर्मचार्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. एसटी आगाराची इमारत जीर्ण व धोकादायक झाली आहे, कर्मचार्यांना भीतीच्या छायेखाली काम करावे लागत आहे. तसेच, या ठिकाणी मुलभूत सुविधांचा अभाव प्रवासी आणि कर्मचारी दोघांनाही जाणवत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रवाशांसाठी बसण्याची सोय नाही आणि पिण्याच्या पाण्याचीही पुरेशी व्यवस्था नाही. कर्मचार्यांसाठी बांधलेल्या विश्रामगृहाची अवस्था एवढी वाईट आहे की, छत कधीही कोसळू शकते, स्वच्छतागृहे ही पूर्णत खराब आणि दयनीय अवस्थेत आहेत. त्यामुळे एकंदरीतच भाईंदर पश्चिमेच्या एसटी आगाराची दुरावस्था झाली आहे.
स्थानिक नागरिक आणि स्थलांतरित संघटनांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. प्रशासनाने तातडीने एसटी आगाराच्या दुरुस्तीकडे लक्ष देऊन प्रवाशांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास प्रवासी आणि कर्मचार्यांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. प्रशासनाने तातडीने पावले उचलून आगाराच्या दुरुस्तीचे काम मार्गी लावण्याची गरज आहे.