रायगडमधील दोघांमुळे पुन्हा एकदा रायगड कनेक्शन उघड
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावर शिंदे अंबेरी ता. संगमेश्वर येथे व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीबाबत अज्ञात व्यक्तीनी दिलेल्या माहितीनुसार सापळा रचून वनविभाग रत्नागिरी व स्थानिक पोलीस विभाग यांनी संयुक्तरित्या कारवाई करून चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सुमारे 6 कोटींची व्हेल माशाची उलटी व एक कार जप्त करण्यात आली आहे. गुरुवारी दुपारी 2 वाजता ही कारवाई करण्यास आली. याप्रकरणात अटक केलेल्यांमध्ये रायगड जिल्ह्यातील माणगाव आणि महाड मधील दोघांचा समावेश आहे.
या प्रकरणी वन व पोलिसांनी केलेल्या कारवाईत प्रसाद प्रविण मयेकर (वय 32, रत्नागिरी जि. रत्नागिरी), नरेंद्र वसंत खाडे (वय 54, रा. काखरतळे ता. महाड जि. रायगड), सत्यभामा राजू पवार (वय 45, रा. दत्तनगर, माणगाव ता. महाड जि. रायगड),अजय राजेंद्र काणेकर (वय -36, रा. असगोली ता. गुहागर) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून व्हेल मासा उल्टी 6.2 किलो व कार वाहन जप्त करून घेतली आहे. वरील सर्व आरोपींच्या विरुध्द वन्यजीव ( संरक्षण ) अधिनियम, 1972 अन्वये परिक्षेत्र वन अधिकारी, चिपळूण यांचेकडील प्र.गु.रि. 02/2021 दि . 21/10/2021 अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
व्हेल माशाची उलटी म्हणजे एक दगडासारखा पदार्थ असतो. त्याला ॲम्बरग्रीस असे म्हणतात. व्हेल माशाने तो तोंडातून बाहेर फेकला की तो वाहत किनाऱ्यावर येतो. या उल्टीतुन सुगंधी द्रव्ये (सुगंधी अत्तर, बॉडी स्प्रे इ.) करता मोठया प्रमाणात मागणी असलेने जागतिक बाजारपेठेमध्ये त्याला मोठी किंमत मिळते. त्याचा पांदुरका पिवळसर तपकिरी रंग आहे. या दगडासारख्या गोळयाला कस्तुरीसारखा गोडसर वास असतो. त्यामुळे त्याचा वापर उच्च प्रतीच्या अत्तराच्या निर्मितीसाठी केला जातो. व्हेल माशाच्या पित्ताशयातून विविध प्रकारची द्रव्ये त्याच्या आतड्यामध्ये जातात आणि तेथे ॲम्बरग्रीसची निर्मिती होत असावी असे समजले जाते.