शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक रविंद्र भगत यांच्या पाठपुराव्याला यश; नवीन पाईपलाईनला मंजुरी
। पनवेल । वार्ताहर ।
कळंबोली परिसरातील नागरिकांना देण्यात येणारे पिण्याचे पाणी हे दूषित येत असल्याच्या वारंवार तक्रारी सिडको दरबारी करण्यात आल्या. अखेर उपोषणाचे हत्यार उपासणारे नगरसेवक रविंद्र भगत यांच्या पाठपुराव्याला आता यश मिळाले आहे. पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनची झालेली दुरवस्था आणि त्यामुळे कळंबोलीकरांना दूषित पाण्याचा करावा लागणार सामना, आता शमणार आहे. नुकत्याच सिडको अधिकार्यांसोबत झालेल्या बैठकीत नव्याने 12 इंची पाईप लाईन टाकण्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
कळंबोली परिसरातील सेक्टर 1 ई ते 4 ई येथील पिण्याच्या पाण्याच्या जुन्या पाईप लाईन बदलण्याचे निर्णय आयोजित बैठकीत घेण्यात आले. यामध्ये कळंबोलीतील जुन्या पाण्याच्या पाईपलाईन काढून नवीन टाकण्यात आल्या, काही ठिकाणी पाण्याच्या लाईन बदलण्यात आल्या नव्हत्या, त्याठिकाणी मंजुरी देऊन ची नवीन लाईन टाकण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. कळंबोली शहरातील नागरिकांना भेडसावत असणार्या पाणी प्रश्नासंदर्भात सेक्टर 1 ई या ठिकाणी 12 इंचाची नवीन पाईपलाईन जोडण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
यावेळी बैठकीला सिडकोचे कळंबोली क्षेत्रातील पाणी पुरवठा अधिकारी अभियंता प्रशांत चहारे, अभियंता गणेश चंदनकर यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक रवींद्र भगत, कळंबोली महिला अध्यक्ष सरस्वती ताई काथारा, विजय भोईर आदींसह नागरिक उपस्थित होते.