मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिस गावाजवळ शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आयसर टेम्पोला अपघात होऊन टेम्पोचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर टेम्पोतील तिघांना किरकोळ दुखापत झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, निलंगा लातूरहून पार्सल साहित्याने भरलेला टेम्पो (क्रमांक एम एच-24,एयु-5831) रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिस गावाजवळआला असताना पहाटेच्या सुमारास अचानक टेम्पोचालकाला डुलका लागल्याने टेम्पोसमोरील कंटेनरवर उजव्या बाजूने धडकला. या अपघातात टेम्पो चालक भरत मोहन जगदाळे (31) रा. कासरशिरले, ता. निलंगा, जि. लातूर याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी राजश्री भरत जगदाळे, मुलगी ऋतिका भरत जगदाळे, चुलत भाऊ धनराज सुखपंत जगदाळे यांना किरकोळ दुखापत झाली.
या अपघाताची माहिती मिळताच अमित गुजरे आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहोचले. यावेळी डेल्टा फोर्स, आयआरबी कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. यानंतर मयत भरत जगदाळे यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी चौक रुग्णालयात नेण्यात आला. याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.