। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरानमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. ही विकासकामे करताना बांधकाम साहित्य हे दस्तुरी या ठिकाणी असलेल्या वाहनतळाच्या जागेत जमा केली जातात. यामुळे पर्यटन काळात याची अडचण होत आहे. ठेकेदारांनी सदर बांधकाम साहित्य जांभा दगड, सिमेंट, काळा दगड, पेव्हर ब्लॉक, ग्रीट इत्यादी आणून वाहनतळाच्या जागेमध्ये साठवणूक केली आहे. परंतु ठेकेदार याला इच्छित स्थळी नेण्यास अनुकूल नसल्याचे दिसत आहे. याकडे वनव्यवस्थापन समिती आणि वनखात्याचे दुर्लक्ष होत आहे. माथेरान हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ आहे. पर्यटक हे आपल्या स्वतःच्या वाहनाने माथेरानला येत असतात. इथे वाहनकर आकारणी देखील चांगल्या पद्धतीने होत असते. परंतु येथे आपले वाहन घेऊन आल्यानंतर मात्र त्यांना पार्किंग बाबतच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. येथील वाहनतळाच्या जागेतील बहुतांश भाग हा येथील सुशोभीकरणासाठी लागणार्या साहित्यांनी आणि जांभा दगडांनी व्यापलेला दिसतो. त्यामुळे येणार्या पर्यटकांना या अडगळीतून रस्ता काढत आपली वाहने कुठे व कशी उभी करावी हा प्रश्न पडतो. एमएमआरडीए मार्फत इथे वाहनतळासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आला आहे. परंतु येथे योग्य नियोजन नसल्याचे दिसते. विकेंड मध्ये तर वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. कित्येक पर्यटकांना यामुळे माघारी फिरावे लागते. यासाठीच वनव्यवस्थापन समिती आणि वनखात्याच्या वरिष्ठ अधिकार्यांनी सदरची बाब गांभीर्याने घेऊन पर्यटकांना होत असलेल्या अडचणींवर लवकरात लवकर पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.