| अलिबाग | प्रतिनिधी |
सागाव आदिवासीवाडी येथे अतिवृष्टीमुळे अनेक घरांचे नुकसान झाले. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी मंगळवारी (दि. 17) आदिवासीवाडीमध्ये जाऊन नुकसानग्रस्तांची भेट घेत नुकसानीची पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्तांची विचारपूस करून त्यांना दिलासा देण्यात आला.
अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील अनेक घरांची पडझड झाली आहे. अलिबाग तालुक्यातील सागाव आदिवासीवाडीमधील अनेकांच्या घरांचे पत्रे उडाल्याने घरांचे नुकसान झाले. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी मंगळवारी सकाळी घटनास्थळी जाऊन नुकसानग्रस्तांची भेट घेतली. त्यांची विचारपूस करून नुकसानीची पाहणी केली. भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. यावेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमळाकर वाघमोडे, शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, रायगड बाजारचे उपाध्यक्ष प्रमोद घासे, नाशिकेत कावजी सरपंच, संतोष गुरव, नरेश गोंधळी, प्रफुल्ल पाटील, प्रणय पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.







